(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा अडथळा दूर होताच, पक्षात पुन्हा एकदा पवार कुटुंबाची मक्तेदारी अधिक मजबूत झाल्याचे चित्र समोर आले आहे. जयंत पाटील यांचा राजीनामा स्वीकारताच शरद पवारांनी तत्काळ माजी आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. शिंदेंनीही आपल्या पहिल्याच निर्णयात पवारांच्या विश्वासू रोहित पवार यांना मुख्य सचिवपदी नियुक्त करत ‘घराणेशाही-मैत्री’चा सूर पकडल्याचे स्पष्ट झाले.
या निर्णयामुळे सध्या पक्षातील प्रमुख पदे थेट पवार कुटुंबाच्या हातात गेली आहेत:
-
शरद पवार – राष्ट्रीय अध्यक्ष
-
सुप्रिया सुळे – कार्यकारी अध्यक्ष
-
रोहित पवार – मुख्य सचिव
पक्षातील अनेक जुन्या आणि वरिष्ठ नेत्यांना या बदलामुळे एका प्रकारे पवार कुटुंबाच्या पूर्ण छायेखाली काम करावे लागणार आहे.
जयंत पाटील यांनी राजीनाम्यानंतर केलेल्या भाषणातील काही शब्दात स्पष्टपणे टोमणे दिसून आले. ते म्हणाले, “पवार साहेबांनी मला प्रदेशाध्यक्ष करताना मेहबूब शेख, सक्षणा सलगर यांसारख्या सामान्य कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे दिली. मी कधीही फाउंडेशन काढले नाही, गट तयार केला नाही. माझ्याविरुद्ध कारस्थाने झाली तरी मी पवार साहेब आणि पक्षावरील निष्ठा सोडली नाही.”
राजकीय वर्तुळात या विधानांचा रोख थेट रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्या दिशेने असल्याचे बोलले जात आहे. जयंत पाटील यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात या दोघांना संघटनेतील विशेष जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या नव्हत्या. ते केवळ आमदार म्हणूनच मर्यादित राहिले. मात्र, त्यांच्याकडून जयंत पाटलांच्या नेतृत्वाला कधीच स्वीकारले गेले नाही, उलट त्यांच्याविरोधात वेळोवेळी पक्षात आणि बाहेरही आवाज उठवण्यात आला. विशेष बाब म्हणजे, या वर्तनावर शरद पवारांनी कधीही शिस्तभंगाची कारवाई केली नाही. त्यामुळे पक्षातील काही मंडळींमध्ये नाराजी निर्माण झाली होती. जयंत पाटील हटवण्यातही याच अंतर्गत संघर्षाचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांच्या अपेक्षांनुसार तात्काळ निर्णय घेऊन रोहित पवारांना प्रमुख पद दिल्याने, पक्षात पवार कुटुंबाची पकड अधिक घट्ट झाली आहे. या घडामोडी ‘राष्ट्रवादीत पवार घराण्याची घराणेशाही पुन्हा अधोरेखित करते’ असा स्पष्ट संदेश देतात. ही स्थिती शरद पवारांच्या राजकीय कौशल्याचे एक ताजे उदाहरण मानली जात आहे, जिथे पक्षातील विरोधकच नव्हे तर आपलेच सहकारीदेखील त्यांच्या रणनीतीपुढे शह-काटशह देण्यात अपयशी ठरतात.

