(मुंबई)
प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले आहे. गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून सुलक्षणा पंडित प्रकृतीच्या अनेक समस्यांनी त्रस्त होत्या. तब्बल १६ वर्षांपासून त्या अंथरुणावर खिळलेल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांचे भाऊ संगीतकार ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या पश्चात बहीण अभिनेत्री विजया पंडित, संगीतकार भाऊ जतीन-ललित असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (७ नोव्हेंबर) रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संगीत आणि अभिनय दोन्ही क्षेत्रात गाजलेले नाव
१९५४ साली एका प्रतिष्ठित संगीतकुटुंबात जन्मलेल्या सुलक्षणा पंडित या पंडित जसराज यांच्या भाची होत्या, तर जतिन–ललित या लोकप्रिय संगीतकार जोडीच्या त्या बहिण होत्या. केवळ नऊव्या वर्षी त्यांनी गायनाला सुरुवात केली आणि १९६७ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘संकल्प’ चित्रपटातील “तू ही सागर है तू ही किनारा” या त्यांच्या अमर गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला. त्यांच्या मधुर आवाजाने आणि भावपूर्ण अभिनयाने ७०–८० च्या दशकातील प्रेक्षकांना त्यांनी मोहिनी घातली.
संजीव कुमारसोबतची अधुरी प्रेमकथा
सुलक्षणा पंडित यांनी गायनासोबतच अभिनयातही आपला ठसा उमटवला. त्यांनी संजीव कुमार यांच्यासोबत ‘उलझन’ आणि ‘संकोच’ या चित्रपटांत भूमिका केल्या. दोघांचे प्रेमसंबंध चर्चेत आले, मात्र हे नाते अधुरेच राहिले. या वैयक्तिक वेदनेचा त्यांच्या पुढील आयुष्यावर खोल परिणाम झाला. त्यांनी लग्न केले नाही आणि शेवटच्या काळात त्या एकट्याच राहिल्या. सुलक्षणा पंडित संजीव कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. मात्र संजीव कुमार अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजीव कुमार यांनी हेमा मालिनी यांना लग्नासाठी प्रपोज केले होते, पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे संजीव कुमार यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. संजीव कुमार यांच्या लग्न न करण्याच्या निर्णयाचा परिणाम असा झाला की सुलक्षणा पंडित यांनीही लग्न केले नाही आणि त्या खऱ्या प्रेमाच्या शोधात आयुष्यभर अविवाहित राहिल्या. संजीव कुमार यांचे १९८५ मध्ये वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी निधन झाले.
आरोग्य आणि आर्थिक अडचणींनी ग्रस्त असतानाही त्यांनी आपल्या आयुष्यभर संगीताची साधना सोडली नाही. सुलक्षणा पंडित यांचा मधुर आवाज, पडद्यावर उपस्थिती आणि संवेदनशील प्रतिभा आजही लक्षात ठेवली जाईल. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे मधुर गायन आणि नितळ अभिनय आजही रसिकांच्या मनात कायम जिवंत आहे.

