(अंबरनाथ)
अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडी पाडा परिसरात पवन वाळेकर हे आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी कार्यालयाच्या दिशेने चार राऊंड गोळीबार केला. सुदैवाने या गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्याने मोठा अनर्थ टळला.
गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. प्रत्यक्षदर्शींनुसार, दोन्ही संशयितांनी सफेद कपडे व हेल्मेट घातले होते. संपूर्ण प्रकार कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गोळीबाराचा आवाज ऐकताच वाळेकर यांच्या कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आले. यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्याही दिशेने गोळ्या झाडल्याची माहिती आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी सुरक्षारक्षक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक तपासात हा गोळीबार धमकावण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक काळात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंबरनाथमध्ये सभा असल्याने या घटनेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या गोळीबारामागे उमेदवाराला धमकावण्याचा आणि निवडणुकीत दहशत माजवण्याचा उद्देश असल्याचे पोलिसांचे प्राथमिक म्हणणे आहे.
पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

