(रत्नागिरी / प्रतिनिधी)
निवळी-जयगड मार्गावरील जाकादेवी तरवळ येथे आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास ट्रक आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात घडला. सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास समोरासमोर झालेल्या या धडकेत टेम्पोमधील तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये अमजद मुल्ला जांभारकर (५०), मुजक्कीर अमजद जांभारकर (२५) आणि फिरदोस न्यायद खळे (४३, तिघेही रा. पडवे, ता. गुहागर) यांचा समावेश आहे. १५ जुलै रोजी सकाळी अमजद जांभारकर हे टेम्पोमधून रत्नागिरीमार्गे जाकादेवीकडे जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या ट्रक (क्र. एमएच-०९-जीजे-४३४७) ने त्यांच्या टेम्पोला जोराची धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की टेम्पोचा पुढचा भाग चक्काचूर झाला. अपघातात टेम्पोतील सर्व तिघे प्रवासी गंभीर जखमी झाले.
या अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिघांनाही पुढील वैद्यकीय उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा करून ट्रकचालकाविरोधात अपघाताची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
या अपघातामुळे काही काळ मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक प्रशासन व नागरिकांनी वेळीच मदत केल्यामुळे जखमींना तातडीची वैद्यकीय मदत मिळू शकली.