(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील लोटे एम.आय.डी.सी. परिसरात स्थित असलेल्या लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीविषयी सध्या सोशल मीडियावर विविध पोस्ट्स आणि व्हिडिओ प्रसारित होत असून, त्यातून व्यक्त होत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. प्राथमिक स्वरूपाची माहिती संकलित करताना, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने दक्षता घेण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीस कंपनीच्या वतीने प्लांट हेड श्री. दीपक पाटील उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान सोशल मीडियावर व्यक्त होत असलेल्या शंका, कायदेशीर प्रक्रिया, वैधानिक परवानग्यांचे पालन, तसेच जनतेशी पारदर्शक आणि जबाबदार संवाद राखण्याचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच, कंपनीने सर्व लागू कायदे, पर्यावरणीय नियम व सक्षम प्राधिकरणांकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी औद्योगिक आस्थापनांनी केवळ नियमांचे पालनच नव्हे, तर स्थानिक नागरिकांच्या भावना आणि चिंता समजून घेणेही तितकेच आवश्यक असल्याचे या बैठकीत अधोरेखित करण्यात आले. नियमपालन आणि पारदर्शकता हीच औद्योगिक विकासाची खरी दिशा असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. दरम्यान, रत्नागिरी पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अपुष्ट माहिती, अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही संशयास्पद बाबींबाबत अधिकृत यंत्रणांशी संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

