(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील मेढे गावातील सावंतवाडी येथे आज मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना टळली. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावत दरड कोसळण्याचे प्रकार घडवू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रवीण धोंडू साळवी यांच्या घरावर दरड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने घरात कोणी नसल्यामुळे जीवितहानी टळली
प्रवीण साळवी आणि त्यांची पत्नी सोमवारी रत्नागिरीला गेले होते. त्यामुळे दरड कोसळली तेव्हा घर बंद होते. दरड कोसळताना प्रचंड आवाज झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आणि घटनास्थळी धाव घेतली. बंद घर पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. प्रत्यक्षात दरड उंच जागेवरून कोसळून चिरा भिंती, पत्रे, संडास व कौले यांचे मोठे नुकसान झाले आहे. घरात पावसाचे पाणी साचल्याने खोली खोली तळ्यासारखी वाटत होती.
दरड कोसळलेल्या ठिकाणाच्या वरच्या बाजूस सस्मिता श्रीनिवास सावंत यांचे घर आहे. सद्यस्थितीत ते घर सुरक्षित असले तरी, दरड खाली कोसळल्यामुळे भविष्यात या घरालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
तलाठ्यांचा अनुपस्थितीत अहवाल तयार करण्यात अडथळा
घटनेची माहिती ग्राम कोतवालांनी तात्काळ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) माने यांना दिली. मात्र, तलाठी मुख्यालयी न राहता देवरुख येथे वास्तव्यास असल्यामुळे ते उशिरा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला असून, एकूण नुकसान अंदाजे १ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या स्पष्ट सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापन काळात तलाठ्यांनी मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अशा गंभीर आपत्तीमधील प्रथम संपर्क दुवा म्हणून त्यांची उपस्थिती महत्त्वाची असते. मात्र, डावखोल तलाठी सर्कल अंतर्गत कार्यरत महसूल अधिकारी सातत्याने मुख्यालयी अनुपस्थित राहत असल्याची तक्रार असून, याचा फटका आपत्काळात जनतेला बसतो आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करून कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
घटनास्थळी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे सहकार्य
घटनास्थळी पोलीस पाटील दीपक सावंत, मिलिंद श्रीकृष्ण देसाई, कोतवाल सचिन देसाई यांनी ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळी मदतकार्य पाहिले. स्थानिक प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तत्काळ पुनर्वसनासाठी प्रयत्न करावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.