(मुंबई)
आम्ही सर्व मुस्लिमांविरोधात नाही, तर राष्ट्रभक्त मुसलमान आमच्यासोबत असल्याचे स्पष्ट करत मंत्री नितेश राणे यांनी कांदिवली येथील प्रचारसभेत आक्रमक भूमिका मांडली. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आमच्यापेक्षा चांगले मराठी बोलणारे मुसलमान आहेत, ते आमच्या सणांमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी होतात, असे सांगत त्यांनी अशा मुसलमानांना राष्ट्रभक्त असल्याचा अभिमान असल्याचे नमूद केले.
मात्र, देशाविरोधात आणि हिंदू धर्माविरोधात जिहाद करणाऱ्यांविरोधात आम्ही ठाम आहोत, असे म्हणत नितेश राणे यांनी तीव्र शब्दांत इशारा दिला. अशा प्रवृत्तींविरोधात कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी सांगितले. ही सभा कांदिवलीत भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली होती.
सभेत बोलताना नितेश राणे यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांबाबतही कठोर विधान केले. १५ तारखेनंतर जे कोणी बांगलादेशी किंवा रोहिंग्या मुंबईत असतील त्यांनी तयारी करून ठेवावी. १६ तारखेनंतर एकाही बांगलादेशी किंवा रोहिंग्याला मुंबईत ठेवणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबई ही मुंबईकरांची, हिंदूंची आणि राष्ट्रभक्तांची असल्याचे त्यांनी यावेळी ठासून सांगितले.
तसेच, महायुतीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांविरोधात कुणी दमदाटी किंवा गुंडगिरी करत असेल तर त्याची चिंता करू नका, संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोडा, असे आश्वासनही त्यांनी दिले. हिंदू मतांमध्ये फूट पाडण्याचे काम काही लोक करत असल्याने त्याचा फटका हिंदू समाजालाच बसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महापालिकेतील प्रश्न, घरांचे विषय सोडवताना अंतिम निर्णय कोण घेऊ शकतो, याचा विचार मतदारांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे यांनी काही राजकीय पक्षांवर टीका केली. उत्तर भारतीय मोठ्या संख्येने मुंबईत राहतात, मराठी यायलाच हवी असे म्हणणाऱ्यांनी आधी बेहरामपाड्यात जाऊन मराठी शिकवावी, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे मूळ शिवसैनिक आहोत, असे सांगत त्यांनी उत्तर भारतीय मतदारांना उद्देशून मुंबईत तुम्ही सुरक्षित आहात, ही गॅरंटी घेऊन मी इथे आलो आहे, असे वक्तव्य केले.
या वक्तव्यांमुळे नितेश राणेंच्या भाषणाची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

