(मुंबई / रामदास गमरे)
“सम्राट अशोकाच्या कालखंडात महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती भारत हा अनेक प्रांत, विभाग यात विखुरलेला होता पाकिस्तान, सिलोन, ब्रम्हदेश ते अफगाणिस्तान पर्यंतच्या भूभागावर चक्रवर्ती सम्राट अशोकाची एकहाती सत्ता होती, त्या सम्राट अशोकाच्या काळातील बोलीभाषा पाली होती आता अडीच हजार वर्षांनंतर बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला त्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने पाली भाषेची ओळख होऊ लागली आणि या पाली भाषेतूनच सध्या बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषा निर्माण झाल्या आहेत. पाली भाषेतील अनेक शब्द मराठी व इतर भाषेत प्रचलित आहेत. परंतु पाली भाषेचा अर्थ आपण समजून घेत नाही, त्यामुळे त्याचा विपर्यास केला जातो. उदाहरणार्थ भगवा आतंकवाद यातील भगवा हा मूळ पाली भाषेतील शब्द आहे, असे अनेक पाली भाषेतील शब्द दैनंदिन बोलीभाषेत वापरले जातात. परंतु त्याची माहिती नसल्याने त्या शब्दांचा विपर्यास केला जातो. हे कुठं तरी थांबलं पाहिजे. धम्म आणि धर्म हे वेगवेगळे प्रवाह असून धम्माचे विचार, आचारसंहिता ही माणसाने माणसाशी कस वागावं यावर अवलंबून असून धर्म हा दांभिकता, भीती, अंधश्रद्धा यावर आधारित आहे व तीच अराजकता आता धम्मा मध्ये घुसू पाहत आहे” असे प्रतिपादन वर्षावास प्रवचन मालिकेच्या दुसऱ्या पुष्पात ‘बौद्ध धम्म आणि आपली जबाबदारी’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत असताना ऍड. प्रज्ञेश चैतन्य सोनवणे यांनी केले.
बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावास प्रवचन मालिकेचे दुसरे पुष्प उपसभापती आनंदराज आंबेडकर विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार समितीचे सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांनी आपल्या पहाडी व प्रभावी आवाजात केले, तसेच संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून देत असताना ऍड. प्रज्ञेश चैतन्य सोनवणे यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकीत कार्यक्रमाची रूपरेषा व प्रास्ताविक सादर केले.
बौद्ध धम्म व धार्मिक विधीचे गाडे अभ्यासक विनोद मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात “बौद्ध धम्म आणि आपली जबाबदारी” या विषयाचा आढावा घेत असताना त्यांनी अनेकविध उदाहरण देऊन समाजात कश्या प्रकारची जागरूकता निर्माण करायला हवी अश्या अत्यंत मौलिक सूचना त्यांनी उपस्थितांना केल्या, भैय्यासाहेबांनी बौद्धाचार्यांची निर्मिती का केली ? उपासक, उपसिकांचे कार्य व कर्तव्ये कोणती यावर प्रकाश टाकीत सर्वांना मौलिक अशी माहिती दिली. संस्कार समिती ही न चुकता शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करते त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमास समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, एच. आर. पवार, अतिरिक्त चिटणीस विठ्ठल जाधव, श्रीधर जाधव, चिटणीस रवींद्र शिंदे, अनिरुद्ध जाधव, महेंद्र पवार, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, तुकाराम घाडगे, अतुल साळवी, यशवंत कदम, जेष्ठ पत्रकार गुणाजी काजिर्डेकर, आनंद जाधव, महिला मंडळाच्या सुशीलाताई जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरतेशेवटी यावर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या बौद्धाचार्यांना साश्रु नयनांनी मूक श्रद्धांजली अर्पण केली तद्नंतर सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे संस्कार समितीचे सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.