कोकण रेल्वे लवकरच हलक्या चारचाकी वाहनांसाठी ‘रो-रो’ (रोल ऑन-रोल ऑफ) सेवा सुरू करण्याच्या तयारीत असून, सध्या याची चाचणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही सेवा सुरु झाल्यास विशेषतः गणेशोत्सव व होळीसारख्या सणासुदीच्या काळात गावाकडे जाणाऱ्या लाखो कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.कोकण रेल्वेच्या पावसाळी तयारीविषयी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संतोष कुमार झा यांनी सांगितले की, रो-रो सेवेचा आराखडा अंतिम होत असून, किती वाहने वाहून नेली जाऊ शकतील याची स्पष्टता लवकरच येईल.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांतून कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवासी खासगी चारचाकी गाड्यांमधून जातात. मात्र, खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना प्रचंड अडथळे येतात. अशावेळी ही ‘रो-रो’ सेवा त्यांच्यासाठी सोयीस्कर ठरेल. रेल्वे गाड्यांद्वारे प्रवासी त्यांच्या गाडीसह थेट कोकणात पोहोचू शकतील. मुंबई–गोवा महामार्गाची दुरवस्था आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी ही कोकणात जाणाऱ्यांसाठी मुख्य समस्या ठरते. रो-रो सेवेमुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल आणि पर्यायाने अपघात व प्रवासाचा वेळही घटेल.
कोकण रेल्वेला आजवर ट्रक वाहतुकीसाठीच्या रो-रो व मालवाहतूक सेवेतून चांगले उत्पन्न मिळते. आता ही सेवा हलक्या वाहनांसाठी खुली झाली, तर प्रवासी आणि रेल्वे – दोघांनाही आर्थिक व सेवाविषयक लाभ मिळेल. गणेशोत्सव, होळी, दिवाळी अशा सणांच्या काळात कोकणात जाणारा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ व आरामदायी करण्यासाठी ही सेवा मोलाची ठरेल. कोकणवासीयांसाठी ही सेवा एक नवीन, पर्यायी आणि विश्वासार्ह मार्ग उपलब्ध करून देईल.