(मुंबई)
मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर लगेचच सोमवारी (28 एप्रिल) संध्याकाळी मुक्तागिरी बंगल्यावर दळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत ईशान्य मुंबईतील अनेक शाखाप्रमुख, पदाधिकारी, तसेच संभाजीनगर, सोलापूर आणि विदर्भातील काही लोकप्रतिनिधी आणि नेतेही सामील झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरे गटासाठी मोठा राजकीय फटका मानला जात आहे.
दळवी यांनी राजीनाम्याचे कारण घरगुती असल्याचे पत्रात नमूद केले असले, तरी राजकीय वर्तुळात त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. ईशान्य मुंबईत दळवी यांचा दबदबा असून, त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या प्रभावक्षेत्राला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, दीड वर्षांपूर्वी (नोव्हेंबर 2023) दळवी यांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा ठाकरे गटाने त्यांची जोरदार पाठराखण केली होती, परंतु आता त्यांचा शिंदे गटात प्रवेश हा ठाकरे गटासाठी धक्कादायक आहे.
दत्ता दळवी हे बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. 2005 ते 2007 या कालावधीत ते मुंबईचे महापौर होते. ईशान्य मुंबईत त्यांचे मजबूत जाळे असून, शिवसेनेत त्यांनी उपनेते आणि विभाग क्रमांक 7 चे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. 2018 मध्ये पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांनी विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हाही त्यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती. दळवी यांची आक्रमक आणि धाडसी नेतृत्वशैली त्यांना शिवसैनिकांमध्ये लोकप्रिय बनवते.
शिवसेना फुटीपासून ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत आहेत. शिंदे गटाने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी जोरदार इनकमिंग सुरू केले आहे. दळवी यांच्यासारख्या प्रभावी नेत्याचा प्रवेश आणि त्यांच्यासोबत अनेक स्थानिक नेत्यांचा समावेश यामुळे शिंदे गट मुंबईत ठाकरे गटाला आव्हान देण्यास सज्ज झाला आहे. मुरबाड, विदर्भ आणि सोलापूरमधील काही नेत्यांचाही आज प्रवेश होत असल्याने शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे.
मुंबई पालिकेवर झेंडा रोवण्यासाठी इतर पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांना आपापल्या पक्षात घेतले जात आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी मुंबईत मोठी खेळी खेळली आहे. त्यांनी कधीकाळी बाळासाहेबांच्या तालमीत राजकारणाचं बाळकडू घेतलेल्या खुद्द दत्ता साळवी यांनाच आपल्या गटात ओढलं आहे. दत्ता दळवी हे मुंबईचे महापौर राहिलेले असून त्यांची ईशान्य मुंबईत मोठी ताकद आहे. त्यांच्या येण्याने एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ताकद वाढणार आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली असून, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून ठाकरेंच्या गडाला मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.