( नवी दिल्ली )
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक असलेला सर्व प्रक्रिया आणि अडथळे दूर केल्याची माहिती आहे. त्यामुळे अधिवेशन सुरू होण्याआधीच नवीन अध्यक्षाचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपदासाठी कोरम पूर्ण; ५०% राज्याध्यक्षांची निवड पूर्ण
राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पक्षांतर्गत आवश्यक असलेल्या अर्ध्याहून अधिक राज्याध्यक्षांची नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, मिझोरम, पुडुचेरी, अंदमान-निकोबार इत्यादी राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. भाजपने देशभरात एकूण ३७ संघटनात्मक विभाग स्थापन केले असून, त्यापैकी २० राज्यांमध्ये अध्यक्षांची निवड पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरातसारख्या मोठ्या राज्यांतील नियुक्त्या लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची मुख्य अट पूर्ण झाली आहे.
या नेत्यांची अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा
नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुढील तीन नेते आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे:
-
मनोहर लाल खट्टर – माजी हरियाणा मुख्यमंत्री व सध्या केंद्रीय मंत्री
-
भूपेंद्र यादव – केंद्रीय मंत्री व निवडणूक रणनीतीत निपुण
-
शिवराज सिंह चौहान – माजी मध्य प्रदेश मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री
हे तिघेही कॅबिनेट मंत्री असल्याने, अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यास मंत्रिमंडळात फेरबदल अपरिहार्य ठरेल. विशेष म्हणजे, तिघांचाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जुना आणि जवळचा संबंध आहे.
खट्टर यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर : मनोहर लाल खट्टर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू मानले जातात. त्यांच्या प्रामाणिक, कडक आणि जातीपलीकडील प्रतिमेमुळे त्यांना व्यापक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. RSS देखील त्यांच्या नावावर सहमती दर्शवेल, असा अंदाज आहे.
भूपेंद्र यादवही मजबूत दावेदार : भूपेंद्र यादव यांनाही अध्यक्षपदासाठी प्रबळ उमेदवार मानले जात आहे. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय असून त्यांनी उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत यशस्वी निवडणूक व्यवस्थापन केले आहे. त्यांचाही संघटनात्मक अनुभव व्यापक आहे.
शिवराज सिंह चौहान यांचेही नाव आघाडीवर : शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशातील एक बडे राजकारणी आणि मोठे प्रस्थ आहे. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर शपथ घेतलेल्या पहिल्या पाच मंत्र्यांपैकी चौहान हे एक होते. भगव्या पक्षात, चौहान यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि भाजपच्या मध्य प्रदेश युनिटचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेश दौरा पूर्ण झाल्यानंतर भाजपकडून अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वात महत्वाचा बदल होण्याची शक्यता आहे.