(दापोली)
परतीच्या पावसाने विलंब केला असला, तरी आता थंडीची चाहूल कोकण किनाऱ्यावर जाणवू लागली आहे. त्याचे पहिले संकेत म्हणजे दापोलीच्या किनाऱ्यावर दिसू लागलेले विदेशी ‘सीगल’ पक्षी! या सुंदर पांढऱ्या पंखांच्या पाहुण्यांनी स्थानिकांसह पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे.
हे सीगल पक्षी सायबेरिया, रशिया आणि उत्तर युरोपातील बर्फाच्छादित प्रदेशातून तब्बल पाच ते सहा हजार किलोमीटरचा प्रवास करून दरवर्षी भारतात पोहोचतात. दरवर्षी नोव्हेंबरच्या सुमारास हे पक्षी कोकण किनाऱ्यांकडे झेप घेतात आणि थंडीच्या हंगामात येथे मुक्काम करतात.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदर, दापोली, गणपतीपुळे आणि आरे-वारे किनाऱ्यांवर या पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. समुद्राच्या लाटांवर झेपावणारे त्यांचे पांढरे थवे, वाऱ्याशी खेळणारी उडाण आणि किलबिलाट यामुळे किनारपट्टीवर थंडीचे सुंदर वातावरण निर्माण झाले आहे.
पर्यटक आणि पक्षीप्रेमी या सुंदर दृश्याचे कॅमेऱ्यात टिपण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यांच्या आगमनामागे कोकणाचे उबदार हवामान आणि समृद्ध सागरी अन्नसाठा हे मुख्य कारण असल्याचे तज्ञ सांगतात. किनाऱ्यावर सहज मिळणारे छोटे मासे, कोळंबी आणि सागरी कीटक हे या सीगल्सचे आवडते खाद्य आहे.
कोकणचा स्वच्छ समुद्र आणि शांत वातावरण हे या परदेशी पाहुण्यांना आकर्षित करते. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा साधारण पावसाळ्याची चाहूल लागताच हे पक्षी पुन्हा आपल्या मायदेशी परततात. अशा रीतीने सीगल्सच्या आगमनाने कोकण किनाऱ्याला हिवाळ्याचा निसर्गरम्य स्पर्श लाभला आहे.

