(दापोली /प्रतिनिधी)
मुंबई–गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसताना खेड तालुक्यातील कळंबणी येथे घडलेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या ६४ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. रामचंद्र गुरव (वय ६४, रा. कळंबणी बुद्रुक) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते गावचे पोस्टमास्तर म्हणून कार्यरत होते.
चार दिवसांपूर्वी पोस्टाच्या कामासाठी दुचाकीवरून निघाले असताना कळंबणी येथून खेड–भरणे दिशेने जाताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने (एमएच ४३ बीवाय ७५१२) जोरदार धडक दिली. या अपघातात गुरव यांच्या डोक्यासह पायाला गंभीर दुखापत झाली होती, तर दुचाकीचेही मोठे नुकसान झाले होते. स्थानिकांच्या तत्काळ मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र अपघातानंतर सलग चार दिवस बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गुरव यांची आज उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
रामचंद्र गुरव हे कळंबणी बुद्रुक गावचे पोस्टमास्तर असण्याबरोबरच गावातील देवस्थानचे पुजारी व खजिनदार म्हणूनही जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. कळंबणी बुद्रुक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, भाऊ व भावजय असा एकत्र कुटुंबीयांचा परिवार आहे. या अपघातप्रकरणी चिपळूण तालुक्यातील खेर्डी परिसरातील कारचालकाविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.

