(चिपळूण)
मुंबईकडे धावणाऱ्या १२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या एस-७ स्लिपर कोचने (सीट क्र. ०२/०४) प्रवास करणाऱ्या ६३ वर्षीय मोनिका डिसुजा यांची हँडबॅग चोरट्याने लांबवण्याची घटना १३ जुलैच्या मध्यरात्री (सुमारे १.३५ वा.) चिपळूण रेल्वे स्थानकावर घडली. या चोरीत २० हजारांचा सॅमसंग गॅलक्सी A55 मोबाईल आणि १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३० हजारांचा ऐवज गेला आहे.
डिसुजा दांपत्य १२ जुलै रोजी उडपी येथून मुंबईकडे निघाले होते. रात्री अकराच्या सुमारास त्यांनी हँडबॅग सीटखाली ठेवून झोप घेतली. गाडी चिपळुणात थांबली तेव्हा पाणी पिण्यासाठी जाग येताच बॅग गायब झाल्याचे लक्षात आले. लगेचच जीआरपीकडे तक्रार दाखल करण्यात आली.
याप्रकरणी चिपळूण रेल्वे पोलिसांनी गुन्हा रजि. नं. १६१/२०२५ नोंदवून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(सी) अन्वये तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज व गाडीतील इतर प्रवाशांची माहिती घेतली जात असून, रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना मौल्यवान वस्तू स्वतःकडेच ठेवण्याचे आवाहन केले आहे.

