(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहत इतकीच मर्यादित न राहता पनवेलपासून थेट रत्नागिरीपर्यंत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर विनाशकारी आणि मानवी आरोग्यास घातक केमिकल कंपन्या मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या असून, या कंपन्यांमधून निर्माण होणारे विषारी पाणी व घनकचरा वाशिष्ठी, जगबुडी, सावित्रीसारख्या नद्यांमध्ये सोडला जात आहे. परिणामी कोकणातील नागरिकांना कर्करोगासारखे असाध्य आजार जडत असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार हुसेनभाई दलवाई यांनी केला.
इटलीतील ‘मिटेनी’ या केमिकल कंपनीत तयार होणाऱ्या पीएफएएस (फॉरएव्हर केमिकल्स) मुळे साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले होते. हे केमिकल्स विघटनशील नसून नष्टही करता येत नाहीत. त्यामुळे इटली सरकारने मिटेनी कंपनीवर कायमस्वरूपी टाळे ठोकले, तसेच कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना तुरुंगवासही ठोठावला. मात्र, हीच कंपनी बंद झाल्यानंतर तिची संपूर्ण यंत्रसामग्री जशीच्या तशी कोकणात आणण्यात आल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. ही यंत्रसामग्री लक्ष्मी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खरेदी केली असून, मिटेनी कंपनीतील एक अधिकारी थेट या कंपनीत संचालक म्हणून नेमण्यात आल्याचा दावाही आंदोलकांनी केला. लक्ष्मी ऑरगॅनिक लिमिटेड ही वासुदेव गोयेंका यांची कंपनी असून तिच्या संचालक मंडळामध्ये मिटेनी कंपनीचे माजी डायरेक्टर अँटोनिया नॉरडेनी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
पीएफएएस हे केमिकल मानवी रक्तप्रवाहात गेल्यास कर्करोग, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच प्रजनन क्षमतेवरही त्याचे अत्यंत घातक दुष्परिणाम होत असल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. असे असतानाही या कंपनीला परवानगी देताना प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि प्रशासनाने या गंभीर बाबींकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी तातडीने बंद करण्यात यावी, या मागणीसाठी दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी व प्रशासनातील अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले असून त्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. या आंदोलनात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून हा विषय राष्ट्रीय पातळीवर नेण्यात येईल, अशी माहिती माजी खासदार हुसेनभाई दलवाई यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हा प्रश्न कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून जनतेच्या आरोग्याचा आणि भावी पिढ्यांच्या अस्तित्वाचा असल्याने पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अशोक जाधव, उदय घाग, सुमती जांभेकर, भरत लब्धे, राजन इंदूलकर, संकेत साळवी, महादेव चव्हाण, सुबोध सावंत-देसाई यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

