(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावर मोरे स्मार्ट सेंटरसमोर दुचाकीस्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत २२ वर्षीय युवक गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी युवकाचे नाव मोहम्मद जुनेद अन्सारी (वय २२, सध्या रा. कामाक्षी पेट्रोलियम, खेड; मूळ रा. मुजफ्फरपूर, बिहार) असे असून तो रात्रीच्या सुमारास शिवकृपा चायनीज सेंटर येथे जेवणासाठी जात असताना, पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या हिरो स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक MH-YH-2557) ने त्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, गाडीचेही नुकसान झाले आहे.
या अपघातात आरोपी दुचाकीस्वार आदित्य साळुंखे (पूर्ण नाव अपूर्ण, रा. कणसकोंड, ता. पोलादपूर, जि. रायगड) हाच दोषी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचे फिर्यादी मोहम्मद साहिल उर्फ अस्लम (वय ३१, व्यवसाय टायर दुकान, कामाक्षी पेट्रोलियम, खेड) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) व मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

