(दापोली)
हर्णे समुद्रकिनाऱ्यावरील सुवर्णदुर्ग किल्ल्याला नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मानाचा समावेश मिळाल्याने दापोली तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे या सुवर्णदुर्गासमोर असलेला ऐतिहासिक गोवा किल्ला दुर्लक्षित अवस्थेत कोसळू लागल्याचे चित्र समोर आले असून, दुर्गप्रेमींमध्ये संतापाची भावना पसरली आहे.
गोवा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे रक्षण करणारा आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला अभेद्य दुर्ग. सुवर्णदुर्गावर नजर ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या या किल्ल्याची सद्यस्थिती मात्र अतिशय दयनीय आणि धोकादायक बनली आहे. किल्ल्याभोवती झाडी वाढली असून, अनेक बुरुजांची पडझड सुरू झाली आहे. संपूर्ण तटबंदी उध्वस्त होताना दिसत आहे.
स्थानिक ग्रामस्थ व इतिहास अभ्यासकांनी वेळोवेळी आवाज उठवूनही शासन व पुरातत्त्व विभागाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. सुवर्णदुर्गला मिळालेला आंतरराष्ट्रीय दर्जा एकीकडे अभिमानास्पद ठरत असला, तरी त्याचवेळी नजरेसमोर असलेला गोवा किल्ला अस्तित्वाच्या संकटात सापडतोय, हे दुर्दैवाचे असल्याचे दुर्गप्रेमींनी नमूद केले.
निधी मंजूर, पण कामाचा पत्ता नाही
या किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला असला, तरी प्रत्यक्षात ठेकेदारांकडून कोणतेही समाधानकारक काम हाती घेतले गेलेले नाही. सध्या या दुर्गाची पडझड झपाट्याने सुरू असून, अनेक भाग धोकादायक बनले आहेत. “किल्ला पूर्णपणे ढासळल्यावरच काम सुरू होणार का?” असा उपरोधिक सवाल उपस्थित केला जात आहे.
शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, दुर्गप्रेमींची मागणी
गोवा किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून, तो मराठा नौदलाच्या सामर्थ्याची साक्ष आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे ही आपल्या वारशाची जबाबदारी आहे. त्यामुळे याकडे अधिक काळ दुर्लक्ष केल्यास हा दुर्ग इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही, अशी तिव्र प्रतिक्रिया येथे व्यक्त होत आहे. पुरातत्त्व विभाग व शासनाने तातडीने हस्तक्षेप करून डागडुजीची कामे युद्धपातळीवर सुरू करावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.