(दापोली)
दापोली बस स्थानकात मंगळवारी दुपारी बसची धडक लागून ७० वर्षीय वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना घडली. वनिता तुकाराम चोपडे (वय ७०, रा. खेर्डी) असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, वनिता चोपडे या मंगळवारी सकाळी गॅस बुकिंगच्या कामासाठी दापोली येथे आल्या होत्या. दुपारी सुमारे १ वाजता घरी परतण्यासाठी बस स्थानकात थांबलेल्या असताना, अचानक एक बस त्यांच्या दिशेने आली आणि त्यांना धडकली. धक्क्यामुळे त्या खाली पडल्या आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान आणि युवासेनेचे कार्यकर्ते यांनी तातडीने धाव घेत त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, अपघाताचा तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे बस स्थानक परिसरात क्षणिक गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, मात्र पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.