(पोलादपूर / शैलेश पालकर)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात उभ्या कापलेल्या डोंगरांमधून दरडी व लाल मातीचे ढिगारे रस्त्यावर कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता गल्वेनाईज्ड स्टीलच्या जाळ्यांचे संरक्षणात्मक उपाय करण्यात आले आहेत. या उपाययोजनेमुळे प्रवासी आणि वाहनचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
कशेडी घाटात 2005 पासून दरडी कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. तीन वर्षांपूर्वी चोळई गावाजवळील डोंगरावर फार्महाऊसकडे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्यामुळे तेथील लाल मातीसह दरडी कोसळून महामार्ग अडवल्या गेल्या आणि दरीकडील वस्तीला धोका निर्माण झाला होता.
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामादरम्यान डोंगरांचे उभे काप करण्यात आल्यामुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. यावर उपाय म्हणून महामार्ग बांधकाम विभागाने रस्ता व डोंगराच्या पायथ्याशी ३ ते ९ फूट उंच काँक्रीटच्या संरक्षक भिंती उभारल्या. मात्र, २० ते ३५ फूट उंचीच्या उभ्या कापलेल्या डोंगरांवरून कोसळणाऱ्या दरडींना या भिंतींनी अटकाव करता न आल्याने त्या अकार्यक्षम ठरल्या आहेत.
दरडग्रस्त चोळई व धामणदेवी-भोगाव भागात महामार्ग विभागाने आता ३० ते ३५ फूट उंच गल्वेनाईज्ड स्टीलच्या जाळ्या बसवण्यास सुरुवात केली आहे. या जाळ्यांमुळे कोसळणाऱ्या छोट्या-मोठ्या दरडींना आळा बसत आहे आणि काही प्रमाणात सुरक्षितता मिळत आहे. तथापि, पावसाळ्यात डोंगरातून कोसळणाऱ्या महाकाय दरडी किंवा मातीच्या प्रचंड ढिगाऱ्यांसाठी या जाळ्या अपुऱ्या ठरू शकतात. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.