(रत्नागिरी)
खल्वायन रत्नागिरी या संस्थेची 317 वी मासिक संगीत सभा आज (शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025) रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळात नेहमीप्रमाणेच सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, एस. टी . स्टँड समोर, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. कै. अन्नपूर्णा ऊर्फ गोदूताई अनंत जोगळेकर स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजऱ्या होणाऱ्या या संगीत सभेत रत्नागिरीच्या प्रसिद्ध गायिका व गुरू सौ. मुग्धा भट– सामंत यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच भक्तीगीतांच्या सादरीकरणाने सदरहू मैफल रंगणार आहे.
सौ.मुग्धा भट-सामंत (रत्नागिरी) ह्यांनी M A music (pune university) आणि संगीत अलंकार(अ भा गां म मं) ह्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. गुरु -: सौ.मंगला आपटे, कै.कुसुम शेंडे, कै.वीणा सहस्त्रबुद्धे, सौ पद्मा तळवळकर, पं. विकास कशाळकर या गुरूकडून त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतलेली आहे. भारतात अनेक ठिकाणी शास्त्रीय, उपशास्त्रीय,नाट्य संगीत व अभंग गायन कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत. अनेक नव्या जुन्या संगीत नाटकात भूमिका ही त्यांनी केलेल्या आहेत. रत्नागिरी येथे मुग्धनाद संगीत अकादमी च्या माध्यमातून गेली 20 वर्ष त्या संगीत वर्ग चालवत आहे व संगीत अलंकार पर्यंत च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे सांस्कृतिक प्रकोष्ठाच्या संचालिका पदावर त्या कार्यरत आहेत.
‘महर्षी अवोर्ड’ (दिल्ली), ‘संगीतरत्न’ (रत्नागिरी), ‘कलाभूषण’ (मुंबई) या पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. तानसेन समारोह (ग्वाल्हेर), गुणीजान बैठक(मुंबई),वास्को सप्ताह, मडगाव दिंडी (गोवा), पंचाक्षरी गवई सम्मेलन (धारवाड़),अभीषेकी महोत्सव(पुणे),कुमार गंधर्व मोहोत्सव ( चिपळूण) अशा अनेक ठिकाणी त्यांचे गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत.
सदरहू कार्यक्रमाला तबला साथ- हेरंब जोगळेकर; हार्मोनियम साथ- श्रीरंग जोगळेकर, पखवाज साथ – मंगेश चव्हाण , तालवाद्य साथ- हर्ष बोंडाळे हे करणार आहेत. सर्व रसिकांना सदरहू मैफल नेहमीप्रमाणेच विनाशुल्क असून, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष श्री. मनोहर जोशी यांनी केले आहे.

