(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळा मालगुंड नंबर एक मध्ये उद्या रविवार दिनांक 13 जुलै रोजी सकाळी १० वाजता सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक जुन्या शाळांपैकी एक असलेल्या मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळा नंबर १ ला यंदाच्या शैक्षणिक वर्ष सन 2025 /26 या वर्षांमध्ये 175 वर्षे पूर्ण होत असून या शाळेचा शतकोत्तर अमृत महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात विविध कार्यक्रम व उपक्रमांनी जीवन शिक्षण शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.
या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन विविध ठिकाणी सध्या कार्यरत असून या शाळेने खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शैक्षणिक प्रगती घडवून आणली आहे. त्यामुळे अनेक माजी विद्यार्थी या शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त एकवटणार असून हा महोत्सव यंदा आजी-माजी विद्यार्थ्यांच्या विशेष सहकार्याने व सहभागात साजरा केला जाणार आहे.
या निमित्ताने शतकोत्तर अमृत महोत्सवाचे विशेष नियोजन व आखणी करता यावी या मूळ उद्देशाने रविवारी 13 जुलै रोजी या शाळेमध्ये सकाळी दहा वाजता सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला सर्व माजी विद्यार्थी ग्रामस्थ पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षण शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया शिर्के आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरीष बापट व सर्व समिती सदस्यांनी केले आहे..

