( रत्नागिरी /प्रतिनिधी )
सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूल (रत्नागिरी शहर) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पालक-शिक्षक संघाची पहिली सभा १२ जुलै रोजी उत्साहात पार पडली. या सभेला शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर आफ्रा, मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट, सुपरवायजर सिस्टर ऍनी, प्रायमरी विभागप्रमुख सिस्टर सुनीता यांच्यासह पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गांचे पालक प्रतिनिधी आणि शिक्षक उपस्थित होते.
शिक्षिका समरिन काझी यांनी जून व जुलै महिन्यात शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची व स्पर्धांची माहिती उपस्थितांना दिली. मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत या वर्षातील शैक्षणिक नियोजनाची सविस्तर माहिती दिली. शाळेत कार्यरत असलेल्या विशाखा समिती, सुरक्षा समिती, परिवहन समिती व सखी सावित्री समिती यांविषयीही त्यांनी पालकांना अवगत केले. यावेळी पालक-शिक्षक संघाच्या माध्यमातून शाळेच्या प्रगतीस चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या सभेत पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट या अध्यक्षपदी राहणार असून, शिक्षिका अरिका तांडेल सचिव आणि अनुष्का धुपकर खजिनदारपदी नियुक्त झाल्या. पालक प्रतिनिधी म्हणून श्रद्धा सावंत सहसचिव आणि सुनीत घुडे सहखजिनदार म्हणून निवडले गेले. सभेचे सूत्रसंचालन शिक्षिका अरिका तांडेल यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका इच्छा नाईक यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.