(अलिबाग)
सहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शुक्रवारी सायंकाळी ६:१४ वाजता कोर्लई समुद्रात हरवलेला फिशिंग बोया पोलिसांच्या शोध मोहिमेत सापडला आहे. हा बोया कोस्ट गार्डकडे सुपूर्द करण्यात येणार असून, यानंतर पोलिसांनी शोध मोहीम समाप्त केल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्याच्या कोर्लई समुद्रकिनारी एका सोलर पॉवरवर चालणाऱ्या फिशिंग बॉयामुळे मागील सहा दिवसांपासून सर्व सुरक्षा यंत्रणा सक्रिय होत्या. रेवदंडा, अलिबाग, मुरूड, कोर्लई आणि मांडवा परिसरातील पोलिस तसेच सागरी सुरक्षा दलांनी अखंड कडक नजर ठेवून या बॉयाचा शोध घेतला. सतत जागा बदलणाऱ्या आणि सूर्यकिरणांनी चार्ज होणाऱ्या या सोलर बॉयमुळे शोधकार्य अधिक आव्हानात्मक झाले होते.
पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी बॉम्ब डिटेक्टरसह तंत्रज्ञानाचा वापर करून या बॉयाचा शोध घेण्यास स्वतः लक्ष केंद्रित केले. त्यांच्या शिताफीने आणि समन्वयाने अखेर शुक्रवारी संध्याकाळी कोर्लई समुद्रकिनाऱ्यावर हा बॉया यशस्वीपणे सापडला. या कामगिरीमुळे सर्व संबंधित यंत्रणांनी श्वास सोडला असून, शोध मोहीम आता पूर्णविरामाला पोहोचली आहे.

