(रत्नागिरी)
सहकार क्षेत्रात उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मे. ई प्लस इंटेलेक्च्युअल मिडीया, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित को-ऑप. बँक्स टॉप १०० समिट २०२५ अंतर्गत “बेस्ट बँक ऑफ द इअर” तसेच “इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इअर” हे मानाचे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. सहकार बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व तळागाळातील जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत बँकेची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी, कष्टकरी, लघुउद्योग व्यावसायिक तसेच सामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळाली असून, ठेवीदार, कर्जदार, सभासद व हितचिंतक यांच्यासाठी विविध आर्थिक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. बँक केवळ आर्थिक व्यवहारांपुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत आहे.
कृषी क्षेत्राला बँकेने नेहमीच प्राधान्य दिले आहे. प्राथमिक शेती सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना वेळेवर व सुलभ कर्जपुरवठा केला जात असून, सहकार क्षेत्रातील मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून संस्थांचे पदाधिकारी व सचिव यांना कर्जवाटप, कर्जवसुली व आर्थिक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात येते. बँकेच्या वतीने दरवर्षी बँकिंग विषयक कार्यशाळा व शेतकरी मेळावे आयोजित करून सहकारी संस्थांच्या सबलीकरणावर भर दिला जातो.
दि. ३१ मार्च २०२५ अखेर बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून बँकेच्या एकूण ठेवी ₹२,८६६.८७ कोटींवर पोहोचल्या आहेत, तर कर्जवाटप ₹२,१९९.६४ कोटी इतके आहे. विशेष म्हणजे बँकेने ₹५,००० कोटींचा एकूण व्यवसायाचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. आर्थिक शिस्तीचे उत्तम उदाहरण म्हणून बँकेला सलग १५ वर्षे ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झाला असून, सलग १३ वर्षे निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण शून्य टक्के राखण्यात बँकेला यश मिळाले आहे.
बँकेच्या ठेवींमध्ये झालेली सातत्यपूर्ण वाढ, कर्जवसुलीतील काटेकोरपणा व नफ्यात झालेली वाढ ही बँकेच्या सक्षम प्रशासनाची साक्ष आहे. या यशामागे बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक तसेच कर्मचारी वर्गाचे मोठे योगदान आहे. बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे व मा. संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने सहकार क्षेत्रात आदर्शवत कामगिरी केली आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यापूर्वी महाराष्ट्र शासनाकडून सहकार भूषण व सहकारनिष्ठ हे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले असून, आतापर्यंत बँकेला एकूण १९ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हे पुरस्कार बँकेच्या गुणवत्तापूर्ण कामकाजाचे व सामाजिक जबाबदारीचे प्रतीक मानले जात आहेत.
बँकेच्या जिल्ह्यात सध्या १९ एटीएम केंद्रे कार्यान्वित असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल बँकिंग सेवा अधिकाधिक विस्तारण्यात येत आहेत. मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, कोअर बँकिंग प्रणाली यामुळे ग्राहकांना सुरक्षित, जलद व सोयीस्कर सेवा मिळत आहे. डिजिटल युगाशी सुसंगत राहून सहकार बँकिंग क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य बँक करीत आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी नोवोटेल हॉटेल, खोपोली येथे उत्साहात पार पडला. निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री. गोपाळ भगत (डेप्युटी सीईओ, इंडियन बँकिंग असोसिएशन), श्री. प्रमोद कर्नाड (माजी कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य बँक) व श्री. अजय ब्रम्हेचा (अध्यक्ष, महाराष्ट्र को-ऑप. बँक फेडरेशन) उपस्थित होते. तसेच मा. सतीष मराठे (संचालक, सेंट्रल बोर्ड ऑफ बँक – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) व श्री. सुन्मेश जोशी (डेप्युटी डायरेक्टर जनरल, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, भारत सरकार) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या सोहळ्याच्या निमित्ताने बँकिंग क्षेत्रात होत असलेले बदल, आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी आव्हाने व भविष्यात सहकारी बँकांची भूमिका यावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. मान्यवरांनी सहकारी बँकांनी ग्राहककेंद्री व तंत्रज्ञानस्नेही धोरणे स्वीकारण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
“बेस्ट बँक ऑफ द इअर” व “इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इअर” हे पुरस्कार प्राप्त झाल्याने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, बँकेच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

