(मुंबई)
राज्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांना सर्वसमावेशक, आधुनिक आणि सुलभ उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्करोगाचे वाढते प्रमाण, उपचारांचे गांभीर्य आणि रुग्णांवरील आर्थिक-मानसिक ताण लक्षात घेता केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूचनेनुसार ‘आसाम कॅन्सर केअर मॉडेल’च्या धर्तीवर राज्यात त्रिस्तरीय (L1, L2, L3) समग्र कर्करोग उपचार सेवा उभारण्यात येणार आहे.
या उपक्रमात L1 स्तरावर टाटा स्मारक रुग्णालय ही राज्याची शिखर संस्था म्हणून काम करणार आहे. L1 च्या मार्गदर्शनाखाली L2 आणि L3 स्तरावरील सर्व रुग्णालयांना प्रशिक्षण, मानवी संसाधन विकास, संशोधन आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.
L2 स्तर : कायमस्वरूपी कर्करोग शिक्षण व सेवा केंद्रे
L2 स्तरावर एकूण 9 केंद्रांची निवड झाली आहे. या केंद्रांमध्ये कर्करोग शिक्षण, पदव्युत्तर प्रशिक्षण (MD, DNB, DM, MCh, फेलोशिप), कर्करोग निदान आणि संपूर्ण उपचार सेवा उपलब्ध राहतील. या केंद्रांमध्ये खालील शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे : छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, मुंबई (जे. जे. रुग्णालय), कोल्हापूर, पुणे (बैरामजी जिजीभॉय), नांदेड, नाशिक (सार्वजनिक आरोग्य विभाग), अमरावती (सार्वजनिक आरोग्य विभाग)
ही केंद्रे भविष्यातील मागणी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने L1 स्तरातही रूपांतरित करण्यात येऊ शकतात.
L3 स्तर : निदान, डे-केअर रेडिओथेरपी आणि किमोथेरपी युनिट्स
L3 स्तरावर कर्करोग निदान, डे-केअर किमोथेरपी व रेडिओथेरपीसारख्या महत्त्वाच्या सेवा देणारी 9 केंद्रे कार्यरत होणार आहेत. यामध्ये : अंबाजोगाई (बीड), यवतमाळ, मुंबई (कामा व आल्ब्लेस रुग्णालय), सातारा, बारामती, जळगाव, रत्नागिरी, ठाणे जिल्हा रुग्णालय, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी
या केंद्रांचे बांधकाम शासनामार्फत होणार असून त्यांचे संचालन सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्वावर केले जाणार आहे. मात्र या सर्व केंद्रांवर नियंत्रण राज्य शासनाकडेच राहील.
महाकेअर फाऊंडेशनची स्थापना
L2 आणि L3 स्तरावरील संस्थांचे व्यवस्थापन, मनुष्यबळ नियुक्ती, PPP धोरण राबविणे, तसेच कर्करोग क्षेत्राच्या समन्वित धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी “महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन” (MAHACARE Foundation) ही कंपनी कायदा 2013 च्या सेक्शन-8 अंतर्गत स्थापन करण्यात येणार आहे.
- अध्यक्षपद : मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
- आवश्यकतेनुसार संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री ‘निमंत्रित सदस्य’
त्रिस्तरीय आरोग्य सुविधांसाठी सिंगल क्लाऊड कमांड व कंट्रोल सिस्टीम उपलब्ध राहणार आहे.
महत्त्वपूर्ण आर्थिक तरतूद
- प्रारंभी 100 कोटी रुपये ‘कॉर्पस फंड’ राज्य शासनाकडून उपलब्ध.
- हा निधी महालपफुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत अंतर्गत कर्करोगासाठी राखीव निधीतून.
- कर्करोग रुग्णालयांना मिळणाऱ्या शुल्कापैकी 20% हिस्सा महाकेअर फाउंडेशनला मिळणार.
- क्लिनिकल ट्रायल्स, CSR, देणग्या, अनुदाने, तसेच
ADB, JICA, जागतिक बँक, IMF यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निधी उभारता येणार. - आवश्यकता भासल्यास JICA/ADB मार्फत मिळणाऱ्या कर्जातून अतिरिक्त निधी उपलब्ध केला जाईल.
राज्यातील रुग्णांसाठी मोठा दिलासा
या उपक्रमामुळे—
- जिल्ह्याच्या पातळीवरच कर्करोग उपचार उपलब्ध होणार
- रुग्ण आणि नातेवाईकांचा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचणार
- अत्याधुनिक उपचार ग्रामीण आणि उपनगरी क्षेत्रातही पोहोचणार
- राज्यात कर्करोग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मानवी संसाधन व तज्ज्ञ डॉक्टरांची निर्मिती होणार
राज्यातील कर्करोग उपचारांची गुणवत्ता, सुलभता आणि विश्वासार्हता वाढविणारा हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.

