(रायगड)
रायगड जिल्ह्यातील मुरूड पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत चरस तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून, एकूण १३ आरोपींच्या टोळीचा उलगडा झाला आहे. ही कारवाई दिनांक २९ जून २०२५ रोजी मध्यरात्री करण्यात आली. या प्रकरणी शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासात उत्तर प्रदेशातील विशाल रामकिशन जैसवाल हा या टोळीचा प्रमुख असल्याचे निष्पन्न झाले. त्याने चरस नेपाळ व उत्तर प्रदेशहून आणल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
आगरदंडा ते मुरूड दरम्यान स्कुटीवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या युवकांकडे मध्यरात्री १:४९ वाजता चौकशी केली असता, स्कुटीच्या डिकीमध्ये ७७६ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ आढळून आला. या प्रकरणात अलवान निसार दफेदार (वय १९, रा. सिद्दी मोहल्ला, मुरूड) याला अटक करण्यात आली. स्कुटीवर मागे बसलेला राजू खोपटकर मात्र घटनास्थळावरून फरार झाला.
विशाल जैसवालच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या १२ साथीदारांची नावे पुढीलप्रमाणे :
१. अनुप राजेश जैसवाल (मुरूड) २. अनुज विनोद जैसवाल (मजगाव) ३. आशिष अविनाश डिगे (काशिद) ४. प्रणित पांडुरंग शिगवण (सर्वे) ५. आनस इम्तियाज कबले (पेठ मोहल्ला) ६. वेदांत विलास पाटील (मजगाव) ७. साहिल दिलदार नाडकर (रोहा) ८. अनिल बंडू पाटील (मांडा, कल्याण) ९. सुनील बुधाजी शेलार (फलेगाव, कल्याण) १०. राजू खोपटकर (मुरूड) ११. खुबी माखनसिंग भगेल (मुरूड)
या टोळीच्या ताब्यातून एकूण २ किलो ६५९ ग्रॅम चरस असा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्याची अंदाजित बाजारभाव किंमत सुमारे ₹१३,६१,००० इतकी आहे.
ही कारवाई रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि विजयकुमार देशमुख व त्यांच्या पथकाने केली. या पथकात पोसई अविनाश पाटील, पोहवा जनार्दन गदमले, पोहवा हरी मेंगाल, पोना किशोर बठारे व पोशी अतुल बारवे यांचा समावेश होता. या यशस्वी कारवाईमुळे मुरूड व परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधातील मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.