(सिंधुदुर्ग)
राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू असतानाच, कोकणात मात्र आश्चर्यकारक आणि नाट्यमय राजकीय हालचाली दिसून येत आहेत. कणकवली शहरात दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत येणाऱ्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट एकत्र येऊन ‘शहर विकास आघाडी’च्या माध्यमातून लढण्याबाबत चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर, शिंदे गटानेही स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर ठाकरे गट आणि शिंदे गट हे शहर विकास आघाडीद्वारे हातमिळवणी करण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.
या आघाडीच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना पुन्हा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याची रणनीती आखली जात आहे. राणे आणि भाजपला आव्हान देण्यासाठी दोनही गट एकत्र येऊन ‘शहर विकास आघाडी’ स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे तळकोकणातील राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत.
कणकवली शहरात या संदर्भात एक गुप्त बैठक झाली असून या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सांवत आदी नेते उपस्थित असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही गट स्थानिक स्तरावर मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी दर्शवत असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना पाठिंबा जाहीर करण्याच्या चर्चांना वेग आला आहे, तर भाजपकडून समीर नलावडे यांचे नाव उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे कणकवली नगरपंचायतीची लढत ‘भाजप विरुद्ध सर्व’ अशी होण्याची शक्यता अधिक आहे.
शिंदे गटाचे माजी आमदार राजन तेली यांनी या चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, “कणकवली शहरातून सर्वांनी एकत्र येऊन ‘शहर विकास आघाडी’च्या माध्यमातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव आला आहे. मात्र, अजून त्या प्रस्तावावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. तो वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे, आणि अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील.”
त्यांनी पुढे सांगितले की, “भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रमुख मंडळींनी चर्चा करून एकत्र येण्याचा प्रस्ताव मांडला. आता वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.”
कणकवलीतील एका गुप्त बैठकीमुळे शिवसेनेच्या दोन्ही गट एकत्र येण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जर अशी अनोखी युती-आघाडी प्रत्यक्षात आली, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभूतपूर्व उदाहरण ठरणार आहे.

