(मुंबई)
राज्यातील सर्वात मोठा समाज असलेल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आणि आंदोलन छेडले होते. त्यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा जीआर काढत मराठ्यांच्या विविध मागण्या मान्य केल्या. परिणामी कुणबीचा पुरावा देणाऱ्या मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याचबरोबर मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण दिले गेले आहे. त्यामुळे मराठा समाज आता ईडब्ल्यूएस प्रवर्गातून बाहेर पडला आहे.
मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालातून वेगळेच चित्र समोर आले आहे. या निकालानुसार, सर्वात कमी कट-ऑफ ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा (445.00 गुण) लागला आहे. त्यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना कमी गुणांवरही निवडीची संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
निकालातून स्पष्ट झालेली आकडेवारी
- ओपन (खुला प्रवर्ग) : 507.50
- एसईबीसी (मराठा) : 490.75
- ओबीसी : 485.50
- एससी : 445.75
- ईडब्ल्यूएस : 445.00
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, ओपन प्रवर्गाची मेरिट सर्वाधिक, तर ईडब्ल्यूएसची मेरिट सर्वात कमी आहे. त्यामुळे ईडब्ल्यूएसमधील उमेदवारांना पुढील काळात स्पर्धा परीक्षांमध्ये मोठा फायदा होणार आहे.
मराठा समाजासमोरचे पर्याय
मराठा समाजाला आता एसईबीसी किंवा ओबीसी या दोनच प्रवर्गांचा पर्याय उपलब्ध आहे. ईडब्ल्यूएसमधून बाहेर पडल्यामुळे मराठा युवकांना या कोट्यातून संधी मिळणार नाही. दुसरीकडे, ओबीसी प्रवर्गात मराठा-कुणबींचा ओघ वाढल्याने स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे भविष्यात ओबीसीसाठीची मेरिट ओपन प्रवर्गापेक्षाही जास्त होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुढील काळातील चित्र
- ईडब्ल्यूएसमध्ये लोकसंख्या तुलनेने कमी असल्याने स्पर्धा कमी राहणार.
- ओबीसी प्रवर्गात मराठा-कुणबींच्या संख्येत वाढ झाल्याने तीव्र चुरस निर्माण होईल.
- एससी, एसटी, व्हीजेएनटी प्रवर्गात असते तशीच स्पर्धा ओबीसीमध्येही जाणवू शकते.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य या ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या निकालातील आकडेवारीमुळे आरक्षण प्रवर्गातील बदल आणि त्याचा परिणाम विचार करण्यास भाग पाडणारा आहे.

