(राजापूर)
जिल्हा परिषदेच्या रायपाटण नं. १ पूर्ण प्राथमिक केंद्र शाळेचा विद्यार्थी श्रीपाद विठोबा चव्हाण याने इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 94.66 टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात आठवा क्रमांक पटकावून आपल्या शाळेचा, गावाचा आणि तालुक्याचा झेंडा उंचावला आहे.
श्रीपादने एकूण 300 पैकी 284 गुण मिळवत हे उज्वल यश संपादन केले. त्याच शाळेतील सुश्लोक स्वप्नील गांगण यानेदेखील 69.33 टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादीत 124 वा क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेसाठी शाळेतून एकूण सहा विद्यार्थी बसले होते आणि सर्वच विद्यार्थ्यांनी यश मिळवत शाळेचा शंभर टक्के निकाल नोंदवला.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर गुरव, उपाध्यक्ष सिद्धेश चांदे, समितीचे सर्व सदस्य, माजी मुख्याध्यापिका सौ. नीलम थरवळ, विद्यमान मुख्याध्यापिका सौ. तांबे, शिक्षक सुनील भांडेकर व सौ. धावडे, तसेच रायपाटणचे सरपंच निलेश चांदे, रायपाटण हायस्कूलचे लिपिक व माजी सरपंच संदीप कोलते यांनी श्रीपाद व सुश्लोकचे अभिनंदन केले आहे.
श्रीपादच्या या यशामध्ये माजी मुख्याध्यापिका सौ. नीलम थरवळ, त्याची आई सौ. अनघा चव्हाण, वडील श्री. विठोबा चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच रायपाटण शाळा नं. ३ ची विद्यार्थिनी हर्षिता म्हात्रे हिनेही जिल्हा गुणवत्ता यादीत ५९ वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. तिच्या यशाबद्दलही शाळेतील शिक्षक, पालक आणि गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.