( रत्नागिरी / कणकवली )
तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ४ जुलै रोजी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी अज्ञाताविरोधात फूस लावून अपहरण केल्याचा गुन्हा कणकवली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी तिचा ठावठिकाणा लावला असून, संबंधित मुलगी तिचा मित्र दिपक जोतीराम माने (वय २४, रा. लांजा) याच्यासह हातखंबा (ता. रत्नागिरी) येथून सापडली.
सदर मुलगी ४ जुलै रोजी शाळेत जाते असे सांगून वडिलांचा मोबाईल घेऊन घरातून बाहेर पडली होती. मात्र ती ना शाळेत गेली, ना घरी परतली. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल लोकेशन व कॉल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू होता.
दरम्यान, मोबाईलचे लोकेशन हातखंबा परिसरात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीएसआय उल्हास जाधव आणि महिला पोलीस कर्मचारी प्रणाली जाधव यांनी शोधमोहीम राबवली. या पथकाने हातखंबा गावातील पानवळ फाटा येथील एका घरातून संबंधित युवती व तिचा मित्र दिपक जोतीराम माने यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दोघांची ओळख इंस्टाग्रामवर झाली होती. सोशल मीडियावरील ओळख पुढे मैत्रीत आणि प्रत्यक्ष भेटीगाठींत रुपांतरित झाली. या अनुषंगाने अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.