(कोल्हापूर/रत्नागिरी)
बनावट कागदपत्रांच्या आधारे आलिशान मोटारींची फसवणूक करून परस्पर विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५९ लाख ७० हजार रुपये किमतीच्या तीन आलिशान मोटारी जप्त करत, बनावट आरसी बुक तयार करणारी यंत्रसामग्री, प्रिंटर, मोटारींच्या बनावट नंबर प्लेट व अन्य साहित्य हस्तगत केले आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये नीलेश रामचंद्र सुर्वे (३३, रा. खेडर्डी, ता. चिपळूण), हसन मगदूम जहाँगीरदार (३१, रत्नागिरी), मोहम्मद अमजद मौहम्मद कुरेशी (४३, मुंबई), सकिब सलीम शेख (२९, भिवंडी), आरटीओ एजंट शहजामा खान (३६, बीड) व शेख शाहनवाज शेख असिफ (४५, बीड) यांचा समावेश आहे. फिर्यादी सागर हरी देसाई (३८, रा. सुदर्शन कॉलनी, कोल्हापूर) यांचा न्यू शाहूपुरी येथे वाहन विक्रीचा व्यवसाय आहे. एप्रिल ते मे २०२४ दरम्यान संशयित संजय दत्तात्रय हावलदार (कळंबा), सुर्वे व मगदूम यांनी देसाई यांच्याशी संपर्क साधून चार आलिशान मोटारी ७२ लाख २५ हजार रुपयांना विकण्याचा सौदा करत, अॅडव्हान्स स्वरूपात दोन लाख रुपये घेतले. मात्र, मोटारी घेतल्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या परस्पर विक्री करण्यात आल्याचे उघड झाले.
पोलिसांनी सुर्वे व मगदूम यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी टीटी फॉर्मवर बनावट स्वाक्षऱ्या करून मुंबईतील ताडदेव आरटीओ कार्यालयातील एजंट मोहम्मद कुरेशी याच्याकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांत बनावट आरसी बुक तयार केल्याचे उघडकीस आले. चौकशीत भिवंडी येथील सकिब शेख याचे नाव पुढे आले. त्याच्याकडून आरसी बुक तयार केल्याचे निष्पन्न झाले.
बीडमध्ये मोठा साठा सापडला
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बीडमध्ये छापे टाकत शहजामा खान याला अटक केली. त्याच्याकडून चौकशीत शेख असिफ याचे नाव पुढे आले. त्याच्या घरातून ८७ कोरे पीयूसी कार्ड, ४७ बनावट आरसी बुक, ३१ अर्धवट तयार कागदपत्रे, विविध वाहनांचे नंबर प्लेट्स, प्रिंटर, सीपीयू, मॉनिटर, कलर रिबिन रोल, प्रिंटिंग कॉर्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांची कारवाई सुरूच
शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणात केलेली कारवाई ही बनावट कागदपत्रांच्या आधारे होणाऱ्या मोठ्या वाहन फसवणूक रॅकेटवर धडक कारवाई मानली जात असून, या टोळीशी संबंधित इतर व्यक्तींचा तपासही सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.