(रत्नागिरी / वार्ताहर)
श्रावण मास अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि कोकणात गणेशोत्सवाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील चित्रशाळांमध्ये गणेश मूर्ती तयार करण्याचे काम मोठ्या जोमात सुरू आहे.
रत्नागिरीतील वरचा फगरवठार येथे राहणारे ज्येष्ठ मूर्तीकार श्री. वामन सुवरे यांच्या चित्रशाळेत आजपर्यंत शंभरहून अधिक गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. गेली तीन दशके मूर्तीनिर्मितीच्या कलेत सातत्याने कार्यरत असलेले सुवरे हे मूर्तीकार गणेशभक्तांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.
या वर्षी श्री. सुवरे यांनी कृष्ण अवतारातील कृष्ण-बालरामाचे बंधुप्रेम, यशोदा-कृष्ण दहीहंडी फोडताना, तसेच सिंहासनावर विराजमान ‘लालबागचा राजा’ अशा विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक मूर्ती साकारल्या आहेत. मात्र तरीही सिंगल मूर्तींना अधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशमूर्ती तयार करताना वापरली जाणारी माती, रंग, ब्रश, पितांबर, हिरे, फेटे या साहित्याच्या किमती वाढल्या असल्या तरी गणेशभक्तांना परवडेल अशाच किमतीत मूर्ती उपलब्ध करून देण्याचा आमचा कायमचा प्रयत्न असतो, असे त्यांनी भक्तीभावाने नमूद केले.
त्यांनी पुढे सांगितले की, “गणेशोत्सव तोंडावर असल्याने आम्ही दिवसरात्र मूर्तीकामात व्यग्र आहोत. मात्र वेळोवेळी होणाऱ्या वीजपुरवठ्यातील अडचणीमुळे कामात अडथळे येतात. तरीही भक्तांच्या प्रेमातून आम्हाला प्रेरणा मिळते आणि ही कला आपुलकी वाढवते.”
पावस, रत्नागिरी व पंचक्रोशीतील गणेशभक्त विशेषतः श्री. सुवरे यांच्या चित्रशाळेला भेट देऊन स्वतःच्या मूर्ती साकारून घेण्यास प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
फोटो: मूर्तीकार वामन सुवरे
छायाचित्र: दिनेश पेटकर, गावखडी