(पाली / वार्ताहर)
मुंबई गोवा महामार्गावरील पाली बाजारपेठ ते सुतारवाडी जाणार्या रस्त्याच्या तोंडावर चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या उंच अपघातप्रवण गटाराच्या मुळे वाहनांना व पादचाऱ्यांना तेथून आत बाहेर करताना तीव्र चढाव व उतार झाल्याने कसरत करावी लागत असून तेथे अपघात होण्याचा धोका वाढल्याने ते गटार तातडीने तोडण्याची मागणी होत आहे.
महामार्गावरील पाली बाजारपेठ मध्ये चुकीच्या पद्धतीने रचना असणारी धोकादायक अशी उंच गटारे बांधण्यात आली आहेत त्याचप्रमाणे बाजारपेठ ते सुतारवाडी जाणार्या मुख्य मार्गाच्या तोंडाला उंच गटार बांधल्याने तीव्र चढाव व आत उतार होऊन अत्यंत धोकादायक होऊन तेथे अनेकदा दुचाकीस्वार वाहनावरून पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत तर अनेकदा वाहने तीव्र उतारामुळे अनियंत्रित होऊन महामार्गावर जाऊन अपघात होण्याची शक्यता असते. त्यात येथे उड्डाणपूल कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी होत आहे.
शिवाय याच रस्त्यावर मध्यवर्ती व राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था, दवाखाने, दुकाने, लॅबोरेटरी, मैदान, व्यायामशाळा, नागरी वस्ती अशा सर्व महत्वाच्या आस्थापना असल्याने व शाळेकडे जाणारा मार्ग असल्याने हा मुख्य रस्ता कायमच वर्दळीचा असतो त्यामुळे या उंच गटाराच्या मुळे जेष्ठ नागरिक, महिला यांना धोकादायकपणे कसरत करत आत बाहेर करावे लागत आहे. शिवाय चारचाकी वाहने उंच गटाराच्यामुळे खालील बाजूला आपटून नुकसान होते आहे.
त्यामुळे महामार्गावरील पाली बाजारपेठ येथील चुकीच्या पद्धतीने बांधलेले अपघातप्रवण उंच गटार तातडीने तोडण्याची मागणी होत आहे अन्यथा होणार्या मोठ्या अपघाताला सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित कंत्राटदार राहतील असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

