(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुका तेली समाज संघाची नुतन तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली असून संतोष रामचंद्र रहाटे, नांदळज यांची तालुकाध्यक्ष पदी तर योगेश चव्हाण यांची सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महिला संघटना तालुकाध्यक्ष म्हणून श्रीमती दीपिका दत्ता कर्वे तर युवक संघटना अध्यक्ष पदी प्रविण महादेव रहाटे, नांदळज यांची निवड करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघटना अंतर्गत संगमेश्वर तालुका तेली समाज संघटनेची तालुका कार्यकारणी निवड करण्यासाठी रविवारी दिनांक २७ रोजी देवरुख येथील चिंतामणी मंगल कार्यालय या ठिकाणी सर्व साधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रघुवीर शेलार, दिनेश नाचणकर, संगमेश्वर तालुका संघटनेचे अध्यक्ष संतोष पावसकर, प्रांतिक महिला अध्यक्ष प्रियांका भोपळकर, महिला अध्यक्षा पद्मा विभूते, तुकाराम किर्वे, दिलीप रहाटे, मनोहर रहाटे , सचिव हरिश्चंद्र पवार, एकनाथ राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम शिव प्रतिमेला, संत शिरोमणी तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या भारतीय पर्यटकांना, विविध मान्यवर मृत व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन संदीप पवार यांनी केले. मावळते अध्यक्ष संतोष पावसकर यांनी संघटनेचे वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच जमा खर्चाची सभागृहाला माहिती दिली. त्यानंतर बेसिक, महिला आणि युवक अशा तीन संघटनांची नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली.
तालुका अध्यक्ष पदी संतोष रहाटे, उपाध्यक्ष पदी पांडुरंग रहाटे, सुरेंद्र लांजेकर, दीपक सकपाळ, सचिव योगेश चव्हाण, सहसचिव दिलीप रहाटे, खजिनदार सदाशिव रहाटे, सल्लागार म्हणून तुकाराम किर्वे, राजाराम विभूते, सदस्य पदी सुरेश महाडिक, जनार्दन रहाटे, राजाराम राऊत, महिला प्रतिनिधी म्हणून नुतन रहाटे यांची निवड करण्यात आली आहे.
महिला कार्यकारणी तालुका अध्यक्ष दीपिका किर्वे, उपाध्यक्ष पदी मेघना रहाटे, मनिषा पावसकर, सचिव मधुरा भोपळकर, खजिनदार श्रृती टिळेकर, सदस्य रिया रहाटे, दौपदी लांजेकर, निलम रहाटे, अपर्णा आंब्रे, संजिवनी रसाळ याची निवड करण्यात आली आहे.
युवक संघटना अध्यक्ष म्हणून प्रवीण रहाटे, उपाध्यक्ष पदी राजेश झगडे, समीर लिंबूकर, सचिव अविनाश आंब्रे, खजिनदार दत्तप्रसाद रहाटे, सदस्य शुभम झगडे, अमित रहाटे, किरण रहाटे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा अध्यक्ष रघुवीर शेलार यांनी रत्नागिरी जिल्ह्यात तेली समाज संघटना अतिशय प्रभावीपणे कार्य करीत असून शासन स्तरावर संघटनेच्या कार्याची दखल घेत पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरात समाज भवन उभारण्यासाठी तीन गुंठे जागा विना मोबदला उपलब्ध करून दिली आहे असे सांगितले. तसेच नवीन कार्यकारिणीच्या पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी स्नेह भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.