(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
तालुक्यातील बुरंबी येथील सुपुत्र सैनिक प्रथमेश प्रताप बाईत हे सध्या दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे लान्स नाईक (MSP रनर) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्चिता राहुल कोकाटे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सौ. कोकाटे यांनी यावेळी सांगितले की “सैनिक हे देशाचे खरे अभिमान आहेत. त्यांच्या मागे उभे राहणारे कुटुंब, पत्नी आणि पालक यांच्यामुळेच ते राष्ट्रसेवेत मनापासून योगदान देऊ शकतात.”
सैनिक प्रथमेश यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “कोकणातून फारच कमी मुले लष्करात जातात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना देशसेवेची प्रेरणा द्यावी. मुलांसोबतच मुलींनाही आता लष्करी विभागात अधिक संधी उपलब्ध आहेत. सध्या सात महिला अधिकारी विविध पदांवर कार्यरत असून त्या तरुणींना प्रेरणादायी ठरत आहेत.”
प्रथमेश यांच्या आजोबा श्री हनुमंत बाईत हेही माजी सैनिक आहेत. त्यांच्या प्रेरणेनेच प्रथमेश यांनी लहानपणापासून लष्करी सेवेत जाण्याचे स्वप्न मनाशी बाळगले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांनी बुरंबी येथील सरफरे हायस्कूल मध्ये पूर्ण केले. त्यानंतर लष्कराच्या परीक्षेत यश मिळवून त्यांनी सेवेला सुरुवात केली.
त्यांची सेवा कारकीर्द विविध ठिकाणी घडली आहे –
- पहिल्यांदा दीड वर्ष लेह-लडाख येथे कामगिरी
- राजस्थानमधील बिकानेर येथे आर्मी कमांडर म्हणून सेवा
- सिकंदराबाद येथे NCC ट्रेनिंग
- देहरादून येथे “स्पेशल फायरिंग” प्रशिक्षण
- सध्या दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे सुरक्षा सेवेत कार्यरत
प्रथमेश यांनी स्पष्ट केले की सैनिकांचे कार्य हे अत्यंत कठीण व धैर्याचे असते. “थंडी, ऊन, पाऊस, नैसर्गिक आपत्ती, दहशतवाद किंवा अतिरेकी हल्ले असोत, प्रत्येक संकटसमयी सैनिक पहिला पुढे येतो. त्यामुळेच आपण सर्व आज सुखरूप आणि सुरक्षित आहोत.”
या कार्यक्रमात ‘अमृता ग्रुप’च्या सविता हळदकर, जानवी चिचकर, सानिका कदम, सुप्रिया कदम, पायल नागवेकर, मानसी पालकर, गायत्री मयेकर, आयेशा मयेकर व अर्पिता शेरे उपस्थित होत्या. सर्वांनी प्रथमेश यांना भावी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

