(मुंबई)
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका भारतीय IT कंपन्यांना बसला असतानाच भारतात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. तामिळनाडूतील एका छोट्या गावात झाडाखाली बसून झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी WhatsApp आणि Microsoft ला टक्कर देणारं मेसेजिंग अॅप ‘अरताई’ (Arattai) सुरू केलं. लाँच होताच हे अॅप देशभरात वेगाने डाउनलोड होत असून अॅप स्टोअरमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.
सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो किंवा यूजर्स असो सर्वांच्या तोंडी एकचं नाव आहे आणि ते म्हणजे अरत्ताई. हे अॅप झोहो कॉर्पोरेशनने विकसित केले आहे. तीन दिवसांत या अॅपवर साइन-अप करणाऱ्यांची संख्या 100 पट वाढली असून, हे अॅप iOS आणि Android दोन्हीसाठी उपलब्ध आहे. हे मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपशी तगडी स्पर्धा करेल अशी अपेक्षा आहे.
साध्या जीवनशैलीतून उभा केलेला अब्जावधींचा व्यवसाय
श्रीधर वेम्बू हे त्यांच्या साध्या जीवनशैलीसाठी आणि अब्जावधींच्या संपत्तीसह जमिनीवर राहण्यासाठी ओळखले जातात. फोर्ब्सच्या 2024 च्या भारतातील टॉप 100 अब्जाधीशांच्या यादीत ते 51 व्या क्रमांकावर आहेत. तरीदेखील ते आजही तामिळनाडूतील तेंकासी या छोट्या गावात राहतात आणि अनेकदा सायकलने फिरताना दिसतात.
शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास
वेम्बू यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक (1989) आणि प्रिन्सटन विद्यापीठातून पीएचडी (1994) केली. करिअरची सुरुवात अमेरिकेतील Qualcomm मध्ये सिस्टम डिझाइन इंजिनिअर म्हणून केली, परंतु त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मोठ्या शहरांऐवजी त्यांनी तामिळनाडूच्या तेंकासी गावात स्थायिक होऊन स्वतःचा व्यवसाय उभा केला.
झोहोची यशोगाथा
1990 च्या दशकात कुटुंबातील सदस्य व मित्रांसोबत त्यांनी AdventNet नावाने कंपनी सुरू केली, जी पुढे Zoho Corporation म्हणून विकसित झाली. 2004 मध्ये त्यांनी Zoho University (सध्याचे Zoho Schools of Learning) सुरू केली, ज्यातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या.
फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया 500 अहवालानुसार, झोहो 1.4 लाख कोटींच्या मूल्यांकनासह देशातील सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. सन 2021 मध्ये त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आला. तसेच ते 2019 सालचे ‘अर्न्स्ट अँड यंग आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ पुरस्कार विजेते ठरले. 2021 मध्ये त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळावर (National Security Advisory Board) नियुक्तीही करण्यात आली.
अरत्ताई अॅपचे खास फिचर्स
1. टेक्स्ट आणि व्हॉइस मेसेज – या अॅपद्वारे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला किंवा ग्रुपला त्वरित मेसेज किंवा व्हॉइस मेसेज पाठवू शकता.
2. ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्स – या अॅपद्वारे तुम्ही हाय-डेफिनिशन कॉल्स करू शकता, हे पूर्णपणे सुरक्षित अॅप आहे.
3. मीडिया शेअरिंग – या अॅपद्वारे तुम्ही तुमचे कागदपत्रे, फोटो, व्हिडिओ आणि इतर फाइल्स सहज शेअर करू शकता.
4. स्टोरी – या अॅपद्वारे तुम्ही व्हॉट्सअॅपप्रमाणेच 24 तासांसाठी स्टेटस ठेवू शकता.
5. चॅनल- व्हॉट्सअपप्रमाणे तुम्ही तुमच्या नावाने चॅनल तयार करू शकता त्यात पोस्ट करू शकता.
6. ग्रुप – या अॅपमध्ये तुम्ही 1 हजार सदस्यांसह ग्रुप चॅट करू शकता.
7. मल्टी-डिव्हाइस सपोर्ट – तुम्ही मोबाईल, डेस्कटॉप आणि अँड्रॉइड टीव्हीसह 5 डिव्हाइसवर एकाच वेळी लॉग इन करू शकता.
8. डेटा स्थानिकीकरण – तुमचा डेटा राष्ट्रीय डेटा गोपनीयता नियमांचे पालन करून, भारतात सुरक्षितपणे संग्रहित केला जाणार.
9. जुन्या फोनवरही काम करेल – स्लो इंटरनेट आणि जुन्या फोनवरही सहज काम करते.
Arratai चा अर्थ नेमका काय?
अरत्ताई हा तमिळ शब्द असून, Arattai या नावाचा अर्थ ‘अनौपचारिक गप्पा’ म्हणजेच Casual Chat असा होतो. दररोजच्या संवादासाठी साधा मेसेजिंग ॲप. Zoho ने लॉन्च केलेल्या या ॲपद्वारे वापरकर्ते मेसेज, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट शेअर करू शकतात, तसेच व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल, स्टोरीज शेअर करणे आणि चॅनेल व्यवस्थापन करण्यासही सक्षम आहे.

