(ठाणे)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, व्यावसायिक सुनील जैन, संजय पुनामिया यांच्यासह पाच जणांविरोधात दाखल असलेल्या खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ प्रकरणांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) चौकशी करून क्लिनचीट दिली आहे. यासंदर्भातील अधिकृत अहवाल CBIने न्यायालयात सादर केला आहे.
५ कोटींच्या खंडणीचा आरोप
२०१८ मध्ये परमबीर सिंह हे ठाणे पोलीस आयुक्तपदावर कार्यरत असताना, यूएलसी घोटाळ्यात अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अगरवाल यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी ४.६८ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. हा आरोप अगरवाल यांचे पुतणे शरद अगरवाल यांनी केला होता..या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात परमबीर सिंह, तत्कालीन डीसीपी पराग मणेरे, सुनील जैन, संजय पुनामिया, मनोज घोटेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जातीवाचक शिवीगाळ प्रकरणही तपासात निष्प्रभ
याच काळात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विविध यंत्रणांकडे तक्रारी पाठवल्या होत्या. या तक्रारीनंतर शहर कोतवाली पोलिसांनी परमबीर सिंह आणि इतर २७ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये पराग मणेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. सदर गुन्हा नंतर कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता.
CBI चौकशीत कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत
या दोन्ही प्रकरणांचा तपास CBIकडे वर्ग करण्यात आला होता. तपास अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून सादर केलेल्या अहवालात परमबीर सिंह यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सीबीआयने त्यांना क्लिनचीट दिली असून, याबाबतचा अधिकृत अहवाल न्यायालयात दाखल केला आहे.

