(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षांखालील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी संघाने दमदार कामगिरी करत क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा १४२ धावांनी पराभव करत आपले वर्चस्व सिद्ध केले.
हा सामना पुण्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पार पडला. रत्नागिरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १०८ धावा केल्या. प्रतिस्पर्धी क्लब ऑफ महाराष्ट्रने ११५ धावा करत ७ धावांची आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या डावात रत्नागिरीच्या खेळाडूंनी पुनरागमन करत २११ धावांचा डोंगर उभारला. विजयासाठी मिळालेल्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्लब ऑफ महाराष्ट्रचा डाव केवळ ६२ धावांत आटोपला.
गुरुप्रसाद म्हस्केने सर्व बाजूंनी गाजवला सामना!
या सामन्यात गुरुप्रसाद म्हस्केने दोन्ही डावांत फलंदाजी आणि गोलंदाजीत शानदार कामगिरी करत सामन्यावर आपली मोहोर उमटवली. त्याच्यासोबत ओम बंदरकर, अथर्व चिले, रूद्र लांजेकर, गावडे आणि स्वरित चाळके यांनी फलंदाजीत ठोस योगदान दिले. गोलंदाजीत श्रवण शिर्केच्या अचूक माऱ्याने विरोधी संघाचा डाव गडगडला.
या स्पर्धेत रत्नागिरी संघाचे आणखी चार सामने पुणे येथे होणार असून, पहिल्या सामन्यातील प्रभावी विजयामुळे रत्नागिरीकडून आता आणखी उज्ज्वल प्रदर्शनाची अपेक्षा वाढली आहे.
स्थानिक मैदान नसतानाही खेळाडूंची राज्यपातळीवर चमकदार झळाळी
गौरवाची बाब म्हणजे रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक मैदान उपलब्ध नाही. तरीही खेळाडूंनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राज्यपातळीवर आपली छाप पाडली आहे.