(मुंबई / प्रतिनिधी)
मुंबईमधील लोअर परळ डिलाईल रोड येथील नाथस्वामी बेकरी मठात आज गुरुवार दि.१०जुलै रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अक्कलकोट स्वामी समर्थांचे निस्सीम उपासक, थोर अधिकारी पुरुष, गुरुवर्य नाथस्वामी व त्यांच्या सदभक्तांनी लोअर परळ येथे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा टुमदार मठ उभा केला आहे. या मठामध्ये दैनंदिन आरती, महाप्रसाद याबरोबरच दररोज दुःखी, पीडित,कष्टी लोकांना मार्गदर्शन आणि सत्संगाचा कार्यक्रम होत असतो. गुरुवर्य श्री नाथस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मठाचे कामकाज चालते. मठामध्ये श्री स्वामी जयंती, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती यासह विविध उत्सव साजरे होत असतात.
गुरुवार दि. १० जुलै रोजी सकाळी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची अभिषेकासह पूजा त्यानंतर दुपारी गुरुवर्य श्री नाथस्वामी यांचे पूजन, भक्तांचे अनुभव कथन, सत्संग आणि महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम दिवसभर सुरू आहेत. तरी भक्तांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी होऊन आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे. या मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची उभी दंडमंडित अत्यंत रेखीव मूर्ती असून मठामध्ये नेहमी चैतन्यदायी वातावरण असते.