(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांचा वेध घेण्यासाठी रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नुकतीच जिल्हा सायबर पोलीस ठाण्याला भेट दिली. या भेटीत त्यांनी ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेत सायबर तपास प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता सुतार आणि त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील हे सायबर पोलीस ठाणे सीसीटीएनएस प्रणालीशी जोडले गेले असून, येथून दाखल होणाऱ्या तक्रारी थेट एनसीआरबी दिल्ली येथे ऑनलाईन पोहोचतात. संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांसाठी हे सायबर पोलीस ठाणे उपयुक्त ठरत असून, आर्थिक फसवणूक, सोशल मिडियावरील सायबर गुन्हे, तसेच ई-फ्रॉड संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या आहेत.
पोलिस अधीक्षक बगाटे यांनी निरीक्षण दौऱ्यात विविध तपास कक्षांतील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी निरीक्षक स्मिता सुतार यांनी सायबर गुन्ह्यांच्या तपासाची प्रक्रिया, वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक साधनांची माहिती दिली. या भेटीदरम्यान एसपी बगाटे आणि एएसपी गायकवाड यांनी संपूर्ण इमारतीची पाहणी करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि कामकाजात अधिक सुसूत्रता आणि तत्परता ठेवण्याच्या सूचना दिल्या.

