(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील पांढरा समुद्र-मुरुगवाडा परिसरात ६३ वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शांताराम सोनू फेपडे (वय ६३, मूळ रा. मानसकोंड, फेपडेवाडी, ता. संगमेश्वर; सध्या रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी शांताराम फेपडे हे पांढरा समुद्र-मुरुगवाडा परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी परिसरात जमलेल्या नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता १९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.५० वाजता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे पुत्र मंगेश फेपडे यांनी पोलिसांना खबर दिली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ११४/२०२६ नोंद करण्यात आली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही सुरू आहे. शांताराम फेपडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.


