(चिपळूण / वार्ताहर)
गुहागर-चिपळूण मार्गावर धावणाऱ्या गुहागर-रत्नागिरी एसटी बसमधून उतरत असताना घोणसरे येथे एका महिलेला गंभीर अपघाताला सामोरे जावे लागले. बसमधून खाली उतरल्यानंतर महिलेच्या पायावरून बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला गुहागर तालुक्यातील रहिवासी असून, नातेवाईकांना भेटण्यासाठी येथील एका रुग्णालयात जात होती. यासाठी तिने सकाळी आठ वाजता गुहागर आगारातून सुटणाऱ्या गुहागर-रत्नागिरी एसटी बसमधून प्रवास सुरू केला होता. घोणसरे येथे बसमधून उतरत असताना हा अपघात घडला. यावेळी बसचे चाक तिच्या पायावरून गेल्याने तिला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला तातडीने मदत केली. प्रकृती गंभीर असल्याने नागरिकांच्या मदतीने तिला पुढील उपचारांसाठी डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे घडला याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


