(चिपळूण / वार्ताहर)
तालुक्यातील पोफळी मार्केट परिसरातील मानकर चाळ येथे भाड्याने राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ३० ऑक्टोबर रोजी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उदय नरसिंग निंबाळकर (वय २३, मूळ रा. उदगीर, जि. लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कामानिमित्त चिपळूण तालुक्यातील पोफळी मार्केट येथील मानकर यांच्या चाळीत भाड्याने राहत होता. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान त्याने राहत्या खोलीच्या छताला असलेल्या लाकडी वाशाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.
दुपारच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक कार्यवाही केली. दरम्यान, उदय निंबाळकर याने आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


