(रत्नागिरी)
कोकण कन्या एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 20112) मध्ये प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या एका संशयिताला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) गुन्हे आणि गुप्तचर शाखेने तात्काळ कारवाई करत अटक केली. या प्रकरणात दोन प्रवासी बेशुद्धावस्थेत आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी चोरी केलेला ऐवज आणि गुंगीचं औषध देखील जप्त करण्यात आलं आहे.
९ जुलै रोजी आरपीएफ रत्नागिरीचे निरीक्षक संजय वत्स, पीआर अमोल पाटील आणि पीआर कोकरे हे कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये नियमित गस्तीस होते. ट्रेन संगमेश्वर स्थानकावर थांबली असताना, मोहम्मद उस्मान घनी आणि त्याचा मुलगा वसीम उद्दीन घनी (वय २५) हे जनरल डब्यातून उतरून संशयास्पदरीत्या स्लीपर कोचमध्ये चढताना आढळले. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्यामुळे आरपीएफने त्यांना तात्काळ S6 कोचमध्ये थांबवले. तपासणी दरम्यान त्यांच्या जवळ तीन मोबाईल फोन आढळले, मात्र त्याबाबत ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांना चिपळूण स्थानकात उतरवून अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
चॉकलेटमधून गुंगीचं औषध दिलं
चिपळूण येथे चौकशीत वसीम उद्दीन घनीने कबूल केलं की, तो मूळचा बिहारचा असून सध्या अंधेरी, मुंबई येथे बांधकाम मजूर म्हणून काम करतो. त्याच्या म्हणण्यानुसार, दादर येथे ‘राजू’ नावाच्या व्यक्तीने त्याला काही चॉकलेट्स दिली आणि मडगावकडे पाठवले. त्याने ८ जुलै रोजी कोकण कन्या एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान त्याने दोन अनोळखी प्रवाशांशी मैत्री करत त्यांना ETIVAN TAB (गुंगीचं औषध) मिसळलेली चॉकलेट्स दिली. काही वेळातच, रत्नागिरीजवळ दोघे प्रवासी बेशुद्ध झाल्यानंतर त्याने त्यांचे दोन मोबाईल, पर्स आणि अन्य कागदपत्रे चोरली. ट्रेन संगमेश्वर स्थानकावर थांबली असताना डबा बदलून तो स्लीपर कोचमध्ये जात असतानाच आरपीएफने त्याला अटक केली.
घटनेची माहिती मिळताच पनवेल आरपीएफचे उपनिरीक्षक विद्यानंद तायडे यांना संपर्क करण्यात आला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत आढळलेले प्रवासी गोकुळ हिराजी तोता (रा. अमरावती) आणि अशोक कुमार राजभर (रा. पश्चिम बंगाल) यांना तातडीने पनवेल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांचीही प्रकृती नाजूक असून उपचार सुरू आहेत.
आरोपीकडून तपासात चोरी केलेला माल जप्त करण्यात आला आहे. यात दोन मोबाईल (ओप्पो आणि व्हिवो), एक पर्स ज्यात ₹710 रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र व तीन एटीएम कार्ड यांचा समावेश आहे. तसेच चॉकलेटच्या पिशवीत गुंगीचे औषधही आढळून आले. हे सर्व साहित्य पंचनामा करून जप्त करण्यात आले.
ही कारवाई आरपीएफ रत्नागिरीचे निरीक्षक संजय वत्स, निरीक्षक सतीश विधाते, आणि त्यांच्या पथकाने कौशल्याने पार पाडली. तपास पूर्ण करून आरोपी व जप्त माल गुन्हे शाखा, शहर पोलिस रत्नागिरी यांच्या स्वाधीन करण्यात आला. आरपीएफच्या तत्परतेमुळे एक गंभीर गुन्हा उघडकीस आला असून, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे.

