(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कौटुंबिक ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. मावशीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाविरोधात पीडित मुलीने तक्रार दाखल केली आहे. विश्रांती घेण्याच्या बहाण्याने मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा, तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा संशयित आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगी डिसेंबर २०२५ पासून आपल्या मावशीकडे राहण्यासाठी आली होती. संशयित आरोपी राज मनोज घोरपडे हा गेल्या पाच वर्षांपासून तिच्या मावशीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्यामुळे संशयित आरोपीची पीडित मुलीशी कौटुंबिक ओळख होती. संशयित आरोपी मुलीला क्लासला जाण्यासाठी आणि तेथून परत आणण्यासाठी मदत करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास संशयित आरोपीने मुलीला काम करून थकल्याने थोडा वेळ विश्रांती घेण्यास सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो तिला एका लॉजवर घेऊन गेला. तेथे खोलीत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास तिचे रेकॉर्डिंग प्रसारित करण्याची धमकीही संशयित आरोपीने दिल्याचा आरोप आहे.
या प्रकारानंतर पीडित मुलीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीच्या आधारे लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) आणि अन्य संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ऑनलाइन पद्धतीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडे प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका देसाई या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.


