( रत्नागिरी /प्रतिनिधी )
राज्य सरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज बुधवार, दि. ९ जुलै २०२५ रोजी रत्नागिरीत धरणे आंदोलन करण्यात आले. चार नव्या श्रम संहितांचा आणि PFRDA कायद्याचा निषेध करत, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन यशस्वीपणे पार पडले.
देशातील प्रमुख कर्मचारी संघटनांपैकी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ आणि विविध श्रमिक संघटनांच्या संयुक्त आवाहनानुसार, देशभर ‘काम बंद आंदोलन’ पुकारण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचारी वर्गानेही या संपात सक्रीय सहभाग नोंदवत आपली एकजूट दाखवली. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, रत्नागिरी शाखेतर्फे सकाळी जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनाच्या अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकरिता निवेदन सादर करण्यात आले. चार श्रम संहितांचा त्वरित रद्द, PFRDA कायदा रद्द करून जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे, रिक्त पदांची भरती, आउटसोर्स, कंत्राटी, मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, कर्मचाऱ्यांना हक्काचे वेतन व सेवा सुरक्षेची हमी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी संघटनांकडून देण्यात आला.
या आंदोलनात जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री. दिनेश सिनकर, सल्लागार श्री. समीर इंदुलकर, श्रीमती अश्विनी कदम, श्रीमती मुग्धा पत्की, श्रीमती मेघा पावसकर, लिपिकवर्गीय संघटनेचे श्री. संजय गार्डी, श्री. नागेश पाडावे, श्री. प्रकाश कांबळे, श्री. महेश गुरव, श्री. प्रमोद चव्हाण, श्री. उमेश पंडीत, लेखा कर्मचारी संघटनेचे श्री. सिद्धार्थ शेट्ये, श्री. अक्षय भाटकर, श्री. स्वप्नील मूरकर, विस्तार अधिकारी संघटनेचे श्री. बोडखे, आफ्रोह संघटनेचे अध्यक्ष श्री. किशोर रोडे, परीचर संघटनेचे श्री. रमेश गोरे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे श्री. संजय साळवी आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

