(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी ठोस आणि निर्णायक कारवाई करत तीन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या आदेशानुसार रत्नागिरी शहर व लांजा पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील सलमान उर्फ आकाश अशोक डांगे (रा. थिबा पॅलेस, माळ नाका, रत्नागिरी) आणि आमिर नजिर मुजावर (रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) या दोन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. सलमान उर्फ आकाश डांगे याच्यावर शरीरा विरुद्धचे गंभीर गुन्हे तसेच अंमली पदार्थ विक्रीसारखे गुन्हे दाखल असून, त्याच्या अंमली पदार्थांच्या विक्रीतून शहरातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याने सामाजिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता.
आमिर नजिर मुजावर याच्यावरही शरीरा विरुद्धचे तसेच महिलांविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल असून, त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली होती. या दोघांची गुन्हेगारी प्रवृत्ती सातत्याने बळावत असल्याने त्यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५६ (१)(अ) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मार्डनकर व पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या प्रभावी पाठपुराव्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांनी या दोघांना रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, रायगड व कोल्हापूर या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, लांजा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार गुरुनाथ यशवंत तावडे (रा. शिपोशी, हनुमानवाडी, ता. लांजा) याच्यावरही कडक कारवाई करण्यात आली आहे. गुरुनाथ तावडे याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५ तसेच भा.दं.वि. कलम ४५७ व ३८० अन्वये घरफोडी व चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा श्री. सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५६ (१)(अ) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, राजापूर यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार गुरुनाथ तावडे याला दोन वर्षांच्या कालावधीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

