(अहमदाबाद)
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी एक गंभीर अपघात घडला. वडोदरा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा ४३ वर्ष जुना ‘गंभीरा पूल’ अचानक कोसळला. या घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
महिसागर नदीवर असलेला हा पूल सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक मध्यभागी तुटला. त्यामुळे पुलावरील दोन ट्रक, एक पिकअप व्हॅन आणि एक कार थेट नदीत कोसळली. त्याचवेळी पुलावरून जात असलेला एक ट्रक अर्धवट लटकलेल्या स्थितीत आढळून आला. हा थरारक प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस आणि आपत्ती निवारण पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले असून पाणबुड्यांच्या मदतीने नदीत कोसळलेल्या वाहनांमधील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. “वडोदरा आणि आणंद यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा पूल कोसळला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हा पूल मध्य गुजरातला सौराष्ट्रशी जोडणारा महत्त्वाचा दुवा होता. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने तात्काळ पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.