(पुणे)
महापालिकेच्या कचरा वाहतूक डंपरखाली चिरडून एका २३ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (२७ मे) दुपारी पुण्यात घडली. छत्रपती शाहू महाराज चौक परिसरात, कॉमर झोनकडे जाणाऱ्या रस्त्यावर झालेल्या या अपघातात एकता भरत पटेल (रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी डंपर चालक त्रंबक शेरखाने (वय ३८, रा. औंध कॅम्प) याला विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता ही मराठवाडा मित्रमंडळ, लोहगाव येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती.
मंगळवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास ती मोपेड दुचाकीवरून कॉमर झोनच्या दिशेने जात होती. तेव्हा छत्रपती शाहू महाराज चौक परिसरात तिच्या दुचाकीला डंपरची धडक बसली. धडकेनंतर एकता रस्त्यावर कोसळली आणि डंपरच्या मागील चाकाखाली येत तिच्या डोक्यावरून चाक गेल्याने ती जागीच ठार झाली.
या घटनेनंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. एकताच्या अकाली निधनामुळे तिच्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.