(मुंबई)
मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील ऐतिहासिक कर्नाक पूल अखेर नव्या नावाने आणि नव्या स्वरूपात नागरिकांसाठी खुला होणार आहे. उद्या गुरुवार, १० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार असून, आता या पुलाला ‘सिंदूर पूल’ हे नाव देण्यात आले आहे. पुलाच्या नावाच्या बदलासाठी उद्घाटन रखडले होते. आता सर्व अडथळे दूर झाल्याने दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होणार असून, गेल्या काही वर्षांपासून त्रास सहन करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
विक्रोळीतील पूल आणि अंधेरीमधील गोखले पूल सुरू झाल्यानंतर कर्नाक पुलाच्या उद्घाटनाकडेही संपूर्ण शहराचं लक्ष लागून होतं. मुंबई महापालिकेने हा पूल १० जूनपूर्वी सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, भार चाचणी, रंगरंगोटी, रेल्वेचे ना हरकत प्रमाणपत्र आणि प्रशासनाचा अहवाल या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटन होत नव्हतं. कारण, राज्य सरकार पुलाचं नाव बदलण्याच्या प्रक्रियेत व्यस्त होतं. अखेर हे नाव ‘सिंदूर’ असे निश्चित करण्यात आलं असून, उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या नव्या नावामागेही एक ऐतिहासिक संदर्भ आहे. ब्रिटीश गव्हर्नरच्या नावावरून असलेलं ‘कर्नाक’ हे नाव बदलून ‘सिंदूर’ असे करण्यामागे केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईची प्रेरणा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा कारवायांना गती देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या पुलाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. यासाठी उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते.
सिंदूर पूल दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर, मोहम्मद अली रोड या परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. १५० वर्ष जुना असलेला मूळ कर्नाक पूल धोकादायक घोषित झाल्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये त्याचे विसर्जन करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त सहकार्याने या पूलाचे पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर विविध अडथळ्यांमुळे पूल सुरू होण्यासाठी तब्बल दोन वर्षांची प्रतीक्षा लागली.
या पूलामुळे पी. डि’ मेलो मार्ग, क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव आणि बंदर भाग यांच्यातील वाहतूक सुरळीत होणार आहे. मागील दहा वर्षांपासून या मार्गांवरील पूर्व-पश्चिम वाहतुकीवर मर्यादा आल्या होत्या. पुलाच्या पुनर्बांधणीमुळे वाहतुकीला दिलासा मिळणार असून, वालचंद हिराचंद मार्ग, शहीद भगतसिंग मार्ग, युसुफ मेहरअली रोड, मोहम्मद अली रोड, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग आणि काझी सय्यद मार्ग यांवरील वाहतूकही सुलभ होणार आहे.
मुंबईकरांसाठी हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग नसून, दैनंदिन जीवनातील गतीचा आधार आहे. ‘सिंदूर पूल’ या नव्या नावासह हा पूल आता नव्या काळातील विकास आणि सुरक्षिततेचं प्रतीक ठरणार आहे.